राजगुरूनगर (प्रतिनिधी) – खेड पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण चौधरी बिनविरोध निवडून आले आहे. पंचायत समितीमधील शिवसेनेच्या सत्तेला राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसनेच्या सदस्यांना बरोबर घेऊन सत्ता काबीज केली. सभापतींच्या 101 दिवसांच्या महानाट्याचा आज शेवट झाला. तर भगवान नारायण पोखरकर यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे अरुण चौधरी यांनी अर्ज दाखल केला. त्यांना वैशाली गव्हाणे यांनी सुचक म्हणून स्वाक्षरी केली. काही वेळाने पोलिसांच्या ताब्यात असलेल्या भगवान पोखरकर यांचे पिंजरा गाडीत आगमन झाले.
कॉंग्रेसचे माजी उपसभापती अमोल पवार, शिवसेनेच्या ज्योती अरगडे, मच्छिंद्र गावडे तत्पुर्वी सभागृहात दाखल झाले होते. ज्योती अरगडे यांनी सुचक म्हणून स्वाक्षरी केली. दोन वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. सभापतीपद ओबीसीसाठी राखीव आहे, त्यानुसार नागरिकांच्या मागास प्रवर्ग प्रमाणपत्राची पडताळणी नसल्यावरून पोखरकर यांच्या अर्जावर चौधरी यांनी आक्षेप घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी पोखरकर यांचा अर्ज अवैध ठरविला.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांनी सभापतिपदी अरुण चौधरी यांची निवड झाल्याचे जाहीर केले. दरम्यान, पोखरकर यांच्यावर 31 मे आणि पुन्हा 18 ऑगस्ट रोजी यांच्यावर अविश्वास ठराव संमत झाला होता. दि. 18 ऑगस्टच्या अविश्वास ठरावाच्या वेळी शिवसेनेच्या पाच सदस्यांनी पक्षाचा व्हीप न पाळता अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले होते.