पुणे (जिल्हा प्रतिनिधी) – खेड पंचायत समिती सभापती भगवान पोखरकर यांच्या अविश्वास ठरावावरून तालुक्यात राजकारण रंगले आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सचिव अनिल देसाई यांनी पंचायत समिती सभापतींच्या ठरावाविरोधात बुधवारी (दि. 18) मतदान करा, यासाठी सदस्यांना व्हीप बजावला आहे. पंचायत समितीसारख्या स्थानिक पातळीवरही पक्षाला व्हीप बजवावा लागणे यासारखी मोठी शोकांतिका नाही. दरम्यान, खेडमध्ये शिवसेनेला योग्य दिशा-दशा दाखवण्यासाठी योग्य नेता नाही का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
शिवसेनेने उपनेते म्हणून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांवर जबाबदारी सोपवली आहे; मात्र त्यांना जिल्ह्यासह संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघातील घडामोडींसह कार्यकर्त्यांवर लक्ष केंद्रीत करावे लागत आहे. त्यामुळे खेड पंचायत समितीचे राजकारण शेवटच्या टोकापर्यंत पोहोचल्यामुळे त्यांचेही हात बांधले गेल्यासारखे झाल्याने अखेर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार व्हीप काढावा लागला असल्याने खेड तालुक्याचा निर्णय आणि संपूर्ण जबाबदारी डोक्यावर पेलण्यासाठी कोणात्या व्यक्तीची नियुक्ती होते की निर्णयक्षम शिवसैनिक आयात करण्याची वेळ खेड तालुका शिवसेनेवर येणार का, असे विविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहे.
खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात शिवसेनेचे सहा, भाजपचे उपसभापती तथा सदस्य, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार अशा 11 सदस्यांनी अविश्वास ठराव आणाला होता. तो 31 मे 2021 रोजी मंजूर करण्यात आला होता; त्यानंतर पोखरकर त्या निर्णयविरोधात न्यायालयात गेले तर इकडे हे सदस्य सहलीवर गेले होते. त्यावेळी त्यांच्य्यावर हल्ला केल्याने पोखरकर यांना अटक करण्यात आली असून ते अद्यापही अटकेत आहे.
दरम्यान, 27 जुलै 2021 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने पोखरकर यांच्या बाजुने निर्णय देत पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सभा घ्यावे असे आदेश दिल्याने ही विशेष सभा बुधवारी (दि. 18) पार पडणार आहे. यात शिवसेनेचे सहा आणि पोखरकर यांच्या बाजुने असलेल्या ज्योती आरगडे यांना पोखरकर यांच्या अविश्वासाविरोधात मतदान करण्याचा व्हीप पक्षाच्या वतीने बजावण्यात आला आहे.
अनुपस्थिती की बाजुने मतदान करणार?
शिवसेना पक्षाने आपल्या सर्व सदस्यांना व्हीप बजावत अविश्वास ठरावाविरोधात मतदान करण्याचे बजावले आहे; मात्र पोखोरकरांच्य्या विरोधात गेलेल्या सहा जणांपैकी एकाची पक्षात पुन्हा वापसी झाली असून उर्वरीत पाच जण अनुपस्थितीत राहणार की अविश्वास ठारावाच्या बाजुने मतदान करणार? जर त्यांनी बाजुने मतदान केले तर पक्ष त्यांची हकालपट्टी करणार का, याकडे आता खेडसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
..तर आढळरावांचे आरोप खरे ठरतील?
महाविकास आघाडी असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शिवसेनेच्या सदस्यांना फितवतले असून हे सदस्य त्यांना जावून मिळाले असल्याने महाविकास आघाडीत खोडा घालण्याचे काम मोहिते पाटील करीत असल्याचा आरोप मध्यतरी माजी खासदार आढळराव पाटलांनी एक छायाचित्र प्रसिद्ध करून केला होता. जर बुधवारी शिवसैनिकांनी पक्षाच्या व्हीप न मानता पोखरकरांविरोधात मतदान केल्यास आढळरावांच्या आरोपात तथ्य होते असे मानले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.