खेड : पूर्व भागातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल

कांद्याला पीळ पडल्याने पिक उध्वस्त; नुकसान भरपाईची मागणी

केंदूर (प्रतिनिधी ) – खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या प्रमुख कांदा पिकावर रोगराई पसरून कांद्याला पीळ पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

दोन आठवड्यापूर्वी खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने कांदा पिकाची लागवड केली मात्र अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे लागवड केलेल्या कांद्यावर रोगराई पसरली आणि कांद्याला पीळ पडायला सुरुवात झाली त्यामुळे दर वर्षाच्या तुलनेत यावर्षी केवळ दहा ते वीस टक्के इतकेच उत्पादन निघणार असल्याची शंका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, एकरी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च करून या कांद्याचं उत्पादन मिळणार नसल्याने उत्पादन खर्च देखील उसनवारी घेऊन केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे उन्हाळ कांदा उत्पादनावर अगोदरच परिणाम झाला आहे.

“एक ते दीड एकर क्षेत्रात मी कांदा लागवड केली. जवळपास चाळीस, पन्नास हजार रुपये खर्च झाला मात्र आमच्या कुटुंबातील सदस्यांना वर्षभर पुरेल इतका कांदा उत्पादन होऊ शकणार नाही. वर्षभर उदरनिर्वाह कसा करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे”. 

– किसन देशमुख (शेतकरी, सिद्धेगव्हाण ता. खेड)

दरम्यान, या सगळ्या असमानी संकटामुळे कांद्याचे उत्पादन घटणार असल्याची व्यापाऱ्यांनी शक्यता वर्तवली आहे. त्यात आता ज्या क्षेत्रात कांदा लागवड झाली आहे त्या क्षेत्रात देखील अवकाळी पावसाने कांद्यावर संक्रात फिरवली आहे. निसर्ग चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस यामुळे कांद्याच्या रोपवाटिका उध्वस्त झाल्या आहेत, रोपांचे आणि बियानाचे भाव गगनाला भिडले आहेत.

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने आधीच मोठ्या संकटात सापडलेला शेतकरी आता नापिकीमुळे आणखी मोठ्या संकटात सापडणार असल्याने कृषी आणि महसूल विभागाने या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती सिद्धेगव्हाणच्या सरपंच साधना प्रकाश चौधरी यांनी शासनाकडे केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.