खेड कृषी विभागाचा “पंचनामा’

चक्रीवादळातील नुकसानीची पाहणी केलीच नाही : अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी

राजगुरूनगर  -खेड तालुक्‍यात चक्रीवादळात झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यात बांधावरची झाडे आणि विहिरींचे पंचनामे आदेश देऊनही पंचनामे करण्यात आले नसल्याचे समोर आले. तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनाम्याबाबत टोलवाटोलवी केल्याने जिल्हा परिषदेच्या उपध्यांक्षानी संतप्त शब्दात नाराजी व्यक्‍त करीत अधिकाऱ्यांना फटकारले.

खेड तालुक्‍यातील खरीप पूर्व हंगाम, शिक्षण, बांधकाम, अंगणवाडी, छोटे पाटबंधारे, नळपाणीपुरठा, पशुसंवर्धन, वीज वितरण कंपनी, महसूल आदि विभागाअखत्यारीत कामांची सध्याची स्थिती आणि निधीबाबत अपूर्ण कामांचा तसेच करोनाबाबातीतील उपाययोजना आणि सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यांचा आढावा बैठक खेड पंचायत समितीमध्ये नुकतीच बैठक घेण्यात आली होती. त्यात कृषी विभागाबाबत शिवतारे यांनी नाराजी व्यक्‍त केली. ही बैठक सुमारे अडीच तास सुरू होती.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खेड पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे, उपसभापती ज्योती अरगडे, जिल्हा परिषद सदस्य तनुजा घनवट, शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख, बाबाजी काळे, पंचायत समिती सदस्य अमोल पवार, भगवान पोखरकर, चांगदेव शिवेकर, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. गाढवे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

निसर्ग चक्रीवादळात खेड तालुक्‍यात नुकसानीचा आढाव्यात 7/12 उताऱ्यावर फळझाडे, विहिरींच्या नोंदी नसल्याने कृषी व महसूल, ग्रामसेवकांनी पंचनामे केले नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगताच अधिकाऱ्यांनी शासन आदेशाचा कित्ता गिरवला. संतप्त पदाधिकाऱ्यांनी, पालकमंत्र्यांनी वरिष्ठांनी आदेश दिले होते तरी ते झाली. नाही. यापुढे पंचनामे केले नाही तर याबाबत कार्यवाही करण्याचा सज्जड दम उपाध्यक्षांनी दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी महसूल विभागाकडे बोट दाखवले.

तालुक्‍यात बी-बियाणे खतांच्या जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारीबाबत कृषी विभागाकडून दखल घेतली जात नाही, तसेच आधारकार्डावर एकाच शेतकऱ्याला 70-80 खतांच्या गोणी दिल्याचे जिल्हा परिषद सदस्यांनी निदर्शनास आणले तर सोयाबीन न उगवल्याच्या शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारीबाबत कारवाई केली नसल्याने नाराजी व्यक्‍त करण्यात आली. दरम्यान, सर्व विभागांचे अहवाल एकत्रित पदाधिकाऱ्यांना देण्यात न आल्याने शिवतारे यांनी पंचायत समितीच्या कारभारावरच नाराजी व्यक्त केली.

नगरपरिषदांच्या कामकाजावर नाराजी
आळंदी, चाकण, राजगुरूनगर नगरपरिषदेने स्वतःची वैद्यकीय यत्रंणा नेमण्याचे जिल्हा पातळीवरून आदेश देऊनही त्यांनी कार्यवाही न केल्याने जिल्हा परिषदेचे कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक आदिंवर ताण पडल्याने पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेच्या गैरकारभारावर नाराजी व्यक्‍त केली.

यापुढे जिल्हा परिषदेची आरोग्य सेवा सहभागी होऊन मदत करेल;मात्र सर्वच आरोग्य कर्मचारी, डॉक्‍टर आदि यत्रंणा न वापरता स्वतःची वैद्यकीय सेवा तयार करून नागरिकांना वैद्यकीय सेवा द्यावी.

तसेच आशा वर्करने केलेल्या कामाचा झालेला मोबदला नगरपरिषदेने त्वरीत द्यावा. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राना रुग्णवाहिका सुस्थितीत ठेवणे, नसेल तर खरेदीचा प्रस्ताव द्यावा, मोठ्या उत्पन्न गटातील ग्रामपंचायत स्वतःची रुग्णवाहिका खरेदी करुन स्वतःची वैद्यकीय सेवा उभारण्यास मान्यता दिली जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.