खेडमध्ये 5 तज्ज्ञ डॉक्‍टरांसह 50 जणांचा स्टाफ

महाळुंगे इंगळेतील कोविड केअर सेंटर सुरू : चाकणमधील 2 खासगी हॉस्पिटलही अधिग्रहित

राजगुरूनगर -खेड तालुक्‍यासह जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्‍यांत करोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने महाळुंगे इंगळे (चाकण ता. खेड) म्हाडाच्या इमारतीमधील कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी 5 तज्ज्ञ डॉक्‍टरांसह 50 जणांचा स्टाफ उपलब्ध करून दिला आहे. चाकण येथील 2 खासगी हॉस्पिटलमध्ये 100 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी करार करण्यात आला आहे, अशी माहिती प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली.

खेड तालुक्‍यात 19 करोना पॉझिटिव्ह झाले असून त्यांच्यात वाढ होण्याची शक्‍यता असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबई, पुणे आदी बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांमध्ये करोना पॉझिटिव्हचे प्रमाण असल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. यापुढील उपाययोजनाबाबत प्रांताधिकाऱ्यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची व राजकीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती त्यानंतर त्यांनी गुरुवारी (दि. 28) तालुक्‍यातील करोना विषाणू संसर्गाबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

प्रांताधिकारी तेली म्हणाले, महाळुंगे येथील सेंटरमध्ये 100 रुग्णांची सोय करण्यात येणार आहे. स्वॅब टेस्ट व करोना संशयित येथे ठेवण्यात येणार आहेत. खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्‍यातील व्यक्‍तींची या ठिकाणी स्वॅब चाचणी व क्‍वारंटाइन केले जाणार आहे. त्यानंतर केअर सेंटरमध्ये 400 पर्यंत रुग्ण ठेवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. भविष्यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढली तर चाकण येथील दोन खासगी रुग्णालयात 100 आयसोलेशन वॉर्डची व्यवस्था केली असून हे हॉस्पिटलचे अधिग्रहित केले आहे. संशयित व पॉझिटिव्ह रुग्णांची ने- आण करण्यासाठी 3 रुग्णवाहिका उपलब्ध केल्या आहेत.

7 गावे कटेन्मेंट झोन
करोनाचे रुग्ण असलेल्या खेड तालुक्‍यातील 7 ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. यात पाईट, कडूस, राक्षेवाडी, झित्राइमळा, कुरकुंडी, पापळवाडी, वडगाव न खेड या गावांचा समावेश आहे.

त्यापैकी 1381 जण क्‍वारंटाइन
लॉकडाऊन झाल्यानंतर सुमारे 32 हजार नागरिक तालुक्‍यात विविध भागातून आले होते. त्यापैकी सुमारे 25 हजार व्यक्‍तींचा क्‍वारंटाइन अवधी संपला आहे. मात्र, चौथ्या लॉकडाऊनमध्ये मुंबईसह इतर ठिकाणावरून 8 हजार 561 ग्रामीण, 472 राजगुरूनगर नगरपरिषद, 1 हजार 972 चाकण नगरपरिषद व 226 आळंदी नगरपरिषद हद्दीत असे तालुक्‍यात एकूण 11 हजार 231 नागरिक आले आहेत. त्यांच्यावर स्थानिक प्रशासन लक्ष ठेवून आहे. त्यापैकी 1381 जणांना क्‍वारंटाइन केले आहे.

कोविड सेंटरमधील स्टाफ
खेड तालुक्‍यातील
10 प्राथमिक आरोग्य केंद्रातील
5- तज्ज्ञ डॉक्‍टर
10- वैद्यकीय अधिकारी
14- नर्सेस
4- औषध निर्माण तंत्रज्ञ
5- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
डाटा ऑपरेटर व इतर अशा 50 स्टाफला मान्यता मिळाली असून अनेकजण प्रत्यक्षात रुजू झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.