पुसेगाव – खटाव ते पुसेगाव पेट्रोल पंपापर्यंतच्या सहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याने प्रवासी आणि वाहनधारक वैतागले आहेत. पाइप टाकून मोऱ्यांची कामे उरकण्यात आली आहेत. मात्र, खटावशेजारील दोन पुलांची कामे रखडली आहेत. या रस्त्याचे काम दर्जेदार आणि लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.
पुसेगाव ते वडूज रस्त्यावर वारंवार खड्डे पडून अपघात होण्याच्या घटना नेहमीच घडतात. माध्यमांनी आवाज उठवल्यावर या रस्त्यावर तात्पुरते खड्डे भरुन डागडुजी करण्याचे काम केले जाते. वाढलेली वाहतूक पाहता या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण नव्याने करण्याची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात या रस्त्याच्या पहिल्या टप्प्यातील सहा किलोमीटरच्या कामासाठी आठ कोटींचा निधी मंजूर झाला होता. निधी मंजुरीनंतर बऱ्याच दिवसांनी रस्त्याच्या साईडपट्ट्या भरण्याचे काम काही ठिकाणी करण्यात आले आहे. सात ठिकाणी पाइप्स टाकून मोऱ्यांची कामे करण्यात आली आहेत.
खटावशेजारील आणि डंगारे वस्तीपुढील पुलांची कामे रखडली आहेत. काही ठिकाणी उतारावर भराव टाकण्याचे काम सुरु आहे. रस्त्याचे काम गेली अनेक दिवस रखडल्याने प्रवासी आणि वाहनधारक वैतागले आहेत. जुन्या रस्त्यावरील मोठे खड्डे भरले असले तरी लहान खड्ड्यांमुळे अडचणी येत आहेत. रस्त्याकडेची झाडे छाटण्यात येत आहेत. ऊंच पुलांवरील रस्ता अरुंद असल्याने दोन वाहने रस्त्यावर बसत नाहीत. अशा ठिकाणी अपघातांचा धोका वाढला आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातून केली जात आहे.
सहा किलोमीटरसाठी तब्बल आठ कोटी
पुसेगावपासून एक किलोमीटर अंतरावरुन या रस्त्याच्या कामाची सुरुवात होणार आहे. सहा किलोमीटरवरील खटाव येथील महाविद्यालयाशेजारील स्वागत कमानीपर्यंत हा रस्ता होणार आहे. आ. महेश शिंदे यांच्या प्रयत्नाने या रस्त्याला अर्थसंकल्पातून तब्बल आठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सहा किलोमीटरसाठी इतका मोठा निधी मिळाल्याने या रस्त्याच्या कामावर आणि गुणवत्तेवर सर्वांचेच लक्ष रहाणार आहे.