जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
पुणे: खाशाबा जाधव क्रीडानिकेतन संघाने जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेतील मुलींच्या 17 वर्षाखालील गटाचे अजिंक्यपद मिळविले. ही स्पर्धा पुणे महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद यांनी आयोजित केली होती.
नेहरू स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेत जाधव क्रीडानिकेतन संघाने अंतिम फेरीत महिलाश्रम प्रशालेचा 34-6 असा पराभव केला.
त्यावेळी पूर्वार्धात त्यांनी 23-6 अशी मोठी आघाडी घेतली होती. त्यांच्याकडून सिंजना योगी व वैष्णवी मोरे यांनी प्रभावी चढाया केल्या. दक्षिता भोसलेने उत्कृष्ट पकडी करीत त्यांना चांगली साथ दिली. महिलाश्रम संघाच्या तनिष्का शिंदे व प्रेरणा पाटील यांनी चिवट झुंज दिली. तृतीय क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मिलिटरी फार्म हायस्कूलने अहिल्यादेवी प्रशालेचा 28-17 असा पराभव केला. मध्यंतराला त्यांच्याकडे 13-5 अशी आघाडी होती. त्यांच्याकडून पार्वती देसाई व मनिषा गिरी चमकल्या. पराभूत संघाच्या सस्कृती खिलारे व तृषा जौंजट यांची लढत अपुरी पडली. उपांत्य फेरीत क्रीडानिकेतन संघाने मिलिटरी फार्म हायस्कूलवर 31-6 असा विजय मिळविला तर महिलाश्रम संघाने अहिल्यादेवी संघाचा 29-23 असा पराभव केला.