पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या

पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्‍यता : शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली

पुणे – जून महिना संपत आला तरी अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे पुणे विभागात खरीप हंगामातील पेरण्या मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत सुमारे 9 हजार 110 हेक्‍टरवर पेरण्या झाल्या होत्या. यंदा मात्र, पावसाअभावी शून्य टक्‍के पेरण्या झाल्या आहेत. पाऊस असाच लांबला तर खरिपाच्या हंगामातील पिकांच्या उत्पादनात घट होण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी 1 ते 20 जून याकाळात नगर जिल्ह्यात 44.3 मिलिमीटर, पुणे जिल्ह्यांमध्ये 66.5 मिलिमीटर तर सोलापूर जिल्ह्यात 43.0 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे याच काळात सरासरीच्या सात लाख 88 हजार 480 हेक्‍टरपैकी 9 हजार 110 हेक्‍टरवर पेरणी झाली होती. यंदा पावसाअभावी पेरण्याचे नियोजन कोलमडले आहे. फक्त जमिनींची नांगरणी पूर्ण झालेली आहे. मागील आठवड्यात पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात हलका व मध्यम स्वरुपाचा पूर्वमोसमी पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही प्रमाणात खरिपाची तयारी सुरू केली होती. अनेक भागात शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेत नांगरणी करून ठेवले आहे. मात्र, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा शेतीची कामे थांबवली आहेत.

पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिमकडील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव तर नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यात प्रामुख्याने भाताची लागवड केली जाते. त्यासाठी कृषी विभागाकडून बियाणांचा पुरवठा कृषी विभागाने केला आहे.

भात लागवडीसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भात रोपवाटिका तयार होतात. यंदाही मोठ्या प्रमाणात होणार असल्याची शक्‍यता आहे; पण जून महिन्याचे पंधरा दिवस ओलांडले तरी पुरेसा पाऊस झालेला नाही. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत असले तरी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय रोपवाटिकेची कामे हाती घ्यायला नको अशा मनस्थितीत शेतकरी आहेत. कारण आता होणाऱ्या रिमझिम पावसामध्ये या रोपवाटिका घेतल्या. त्यानंतर पाऊस झाला नाही तर मोठी अडचण निर्माण होईल. त्यामुळे बियाणे घेऊन ठेवण्यात आली आहेत; पण अद्याप रोपवाटिका तयार केलेल्या नाहीत. उर्वरित सोलापूर पुणे आणि नगर जिल्ह्यातील भात पट्यातील तालुके वगळता शेतकऱ्यांनी चांगला पाऊस होईल या अपेक्षेने खते बियाणांची खरेदी सुरू केली असल्याचे दिसून येते. मात्र, पावसाने अजूनही हजेरी न लावल्याने खते बियाणे पडून असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

रोपवाटिका तयार केलेल्या नाहीत
जून महिना निम्मा संपला तरी पावसाचा पत्ता नाही आहे. खरिपाच्या पेरण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनींची मशागत कामे उकरून घेतली आहे. पण पावसाअभावी पिकांच्या रोपवाटिका तयार केलेल्या नाहीत. कारण पुरेसा पाऊस झाल्याशिवाय रोपवाटिकेची कामे हाती घ्यायला नको अशा मनस्थितीत शेतकरी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.