चाफळमध्ये खरीप पिके भुईसपाट

चाफळ  -गत दोन दिवसात झालेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतातील पिकांची दाणादाण उडाली आहे. परिसरातील भात पिके झोपली असून हायब्रीडचेही नुकसान झाले आहे. भुईमुगाच्या शेंगांना कोंब येण्याची शक्‍यता आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच बळी ठरणारा शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटाचा सामना करत आहे. सतत पडणाऱ्या पावसाने हाता-तोंडाशी आलेली पिके आडवी होऊन कुजण्याची शक्‍यता असल्याने विभागातील शेतकरी आता पाऊस थांबण्यासाठी साकडे घालू लागला आहे.

जूनच्या अखेरीस खरीप पिकांना पावसाची आवश्‍यकता होती. यासाठी शेतकऱ्यांनी देव पाण्यात घातले. त्यानंतर पावसाने चांगल्या पद्धतीने पुर्नआगमन केले. मात्र, पुढे पावसाने थांबण्याचो नावच घेतले नाही. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेली खरीप हंगामातील पिके वाया जाताय की काय अशी शक्‍यता निर्माण झाली. या शक्‍यतेला गेल्या चार दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाने दुजोराच दिला.

येथील हायब्रीड, भात, भूईमूग काढण्यायोग्य होऊनही परतीच्या पावसामुळे त्याला फटका बसला आहे. भुईमूगाच्या शेंगांना कोंब येण्याची स्थिती बनली आहे. तर वादळी पावसामुळे भात पीक भुईसपाट झाले आहे. या पिकात पाणी साचून राहिल्याने पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या चार दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाचा काढणी व मळणी हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. हा पाऊस असाचा राहिल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. प्रशासनाने शेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी चाफळ विभागातील शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.