नवी दिल्ली – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी मिळण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास ते पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची जागा घेतील.
आझाद यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत 15 फेब्रुवारीला समाप्त होणार आहे. ते जम्मू-काश्मीर विधानसभेतून राज्यसभेवर निवडून गेले होते. मात्र, राज्याचा दर्जा रद्द होऊन केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर सध्या जम्मू-काश्मीरात विधानसभा असित्वात नाही. आझाद यांच्या सदस्यत्वाची मुदत संपत असल्याने राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त होणार आहे. आता त्या पदाची जबाबदारी कर्नाटकमधील नेते खर्गे यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतल्याची माहिती पक्षाच्या सुत्रांनी दिली. त्यासंबंधीचे पत्रही कॉंग्रेसने राज्यसभा अध्यक्ष एम.व्यंकय्या नायडू यांना पाठवले असल्याचे त्या सुत्रांकडून सांगण्यात आले.
खर्गे यांनी 2014 ते 2019 या कालावधीत कॉंग्रेसच्या लोकसभेतील नेतेपदाची जबाबदारी सांभाळली. मात्र, कॉंग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा त्यांना मिळाला नाही. आता संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद भुषवण्याची संधी त्यांना मिळणार आहे.