खराडी गाव बनले ‘ग्लोबल’

स्थानिक नागरिकांना व्यवसायाचे नवनवीन मार्ग उपलब्ध

खराडी परिसरात गेल्या 12 वर्षांत आयटी पार्कच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या आल्यामुळे या भागाचा कायापालट झाला आहे. पुणे शहराजवळील एक गाव अशी ओळख असणाऱ्या खराडीला आयटी कंपन्यांनी जागतिक स्तरावर नेऊन पोहोचविले. त्यामुळे स्थानिक नागरिकांना व्यवसायाचे नवनवीन मार्ग उपलब्ध झाले आहेत; तर जवळपास दोन ते अडीच लाख आयटी कर्मचारी या भागात सध्या कार्यरत आहेत. ईव्हॉन आयटी पार्क, झेंसार आयटी पार्क तसेच ईव्हन दोन, असे आयटी पार्कचे साम्राज्य या भागात निर्माण झाले आहे. त्यात सध्या आणखी वाढ होत असून त्याचे कामही सुरू आहे. या आयटी कंपन्यांच्या वाढत्या साम्राज्यामुळे खराडीचा विकास झाला आहे.

बारा वर्षांपूर्वी खराडी गाव हे पुणे शहराला लागून असणारे एक गाव म्हणून ओळखले जायचे. पण, महापालिकेत वडगावशेरी व खराडी या भागांचा समावेश झाला. त्यानंतर याठिकाणी सुरू झालेल्या विकासकामांमुळे या भागाचा बदल होत गेला. एकाबाजूला ग्रामीण बाज सांभाळणारे कुस्तीचे आखाडे, भाजीमंडई, ग्रामीण बाजार पेठ असे दिसत होते; तर दुसरीकडे टोलेजंग इमारती उभ्या राहात होत्या. गेल्या बारा ते तेरा वर्षांत या भागाचा चेहरामोहराच बदलला आहे. आता या भागातून फिरताना आपण परदेशातील एखाद्या परिसरात फिरतो आहोत काय असेच वाटू लागते.

आजच्या घडीला परिसरात शेकडो आयटी कंपन्या आहेत. त्यात सुमारे लाखाहून अधिक कर्मचारी कामाला आहेत. या कर्मचाऱ्यांमुळे या परिसराचे अर्थकारण बदलले आहे. आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या घसघसशीत पगारांमुळे या परिसरात चलन वाढले. त्यात अनेक कर्मचारी बाहेर गावाहून किंवा परेदशातील असल्यामुळे त्यांच्या राहण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या इमारती उभ्या राहिल्या. बांधकाम व्यावसायिकांनी जागा खरेदी करून याठिकाणी मोठमोठे गृहप्रकल्प उभारले. आज या गृहप्रकल्पांचे दर सुद्धा पुणे शहरातील इतर भागांपेक्षा अधिक आहेत.

हॉटेल व्यवसायाबरोबर दुसरा व्यवसाय या परिसरात चांगला सुरू आहे. तो म्हणजे, पेइंग गेस्टचा. यासाठी प्रत्येकी पाच ते सात हजार रुपये दर आकारले जातात. एका फ्लॅटमध्ये तीन ते चार मुले राहतात. त्यामुळे फ्लॅट मालकाला उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. कंपनीच्या शेजारी फ्लॅट मिळाल्याने सोयीचेसुद्धा होते.

आयटी कंपन्यांमुळे अनेक मोठ्या सोसायटी या भागात आल्या आहेत. सध्या परिपूर्ण विकसनशील भाग म्हणजे खराडी हा समजला जात आहे. त्यामुळे पुण्यात नव्याने स्थायिक होणारा नागरिकसुद्धा खराडी या शहराची निवड करताना दिसत आहे. आयटी हबमुळे रस्त्यांचे नियोजन, पाण्याचे व्यवस्थापन खूप चांगले झाले आहेत. त्यामुळे पहिले खराडी गाव ते सध्याचे आयटी हब आणि मूळ खराडी यामध्ये खूप मोठा फरक झालेला दिसून येतो.

– चंद्रकांत जगधने

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)