पिंपरी – करोनाचे सावट लक्षात घेत, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत, उद्योगनगरीत खंडेनवमी साजरी करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत, कामगारांनी यंत्र व उपकरणांचे पूजन केले. काही कंपन्यांमध्ये पारंपारिक पद्धतीला फाटा देत केवळ मशीनचे पूजन करण्यात आले. त्यामुळे उद्योगनगरीत काही ठिकाणी उत्साह तर काही ठिकाणी शांततेत परंपरा पूर्ण करण्यात आली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर खंडेनवमी साजरी करण्याच्या कंपनी व्यवस्थापनाच्या आवाहनाला कामगार संघटनांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
उद्योगनगरीच्या इतिहासात प्रथमच खंडेनवमी यंदा साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. बहुतांशी सर्वच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मोजके कामगार प्रतिनिधी व व्यवस्थापन प्रतिनिधींच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. कामगारांना मिठाई बॉक्सचे वाटप करत थोडक्यात कार्यक्रम उरकण्यात आला, अशी माहिती उद्योजक सुरेश म्हेत्रे यांनी दिली.
मावळ तालुक्यातील कान्हे व तळेगाव एमआयडीसीत खंडेनवमी साजरी करण्यात आली. कान्हे येथील महिंद्रा सीआयई कंपनीत यंत्रपुजन व कामगारांना मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी कंपनीचे मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल देसाई, प्रकल्पप्रमुख विशाल मालुसरे, कामगार संघटना अध्यक्ष गणेश भेगडे, मनुष्यबळ विभागप्रमुख विद्याधर भोंगे, मनुष्यबळ अधिकारी राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.
भोसरी येथील डायनोमर्क कंपनीमध्ये खंडेनवमी निमित्त प्रत्येक कामगाराने आपल्या मशीनची नारळ फोडून, हार घालून सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळून विधिवत पूजा केली. तर व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत व संचालिका आमिता राउत यांच्या हस्ते कंपनीच्या प्रवेशद्वाराची विधिवत पूजा करण्यात आली. कंपनीतील दत्त मंदिराला रंग देऊन ,आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. खंडनवमीनमित्त दत्त दत्तमंदीरात सामुहिक आरतीकरण्यात आली. यावेळी व्यवस्थापकीय संचालक, किशोर राऊत यांनी सर्व कामगारांनी वर्षभर अपघात विरहीत केलेल्या कामाचे कौतुक केले. सर्व कामगारांना भेटवस्तू म्हणून आपट्याची पाने व आर्थिक मदत किशोर राउत यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी मनुष्यबळ विकास विभाग प्रमुख सुर्यकांत मुळे, विभाग प्रमुख दिलीप ईधाते, हर्षल शेळके,राजेश वैद्य,अकाऊंट विभाग प्रमुख प्रविण बाराथे,अक्षरा राऊत, विनायक शेरकर, केतकी राउत, बापुराव हगारे आदी उपस्थित होते.
आकुर्डीतील प्रिमियम ट्रान्समिशन कंपनीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत, साध्या पद्धतीने खंडेनवमी साजरी करण्यात आली. करोनाच्या महामारीमुळे जे आपले सर्वाचे नुकसान झाले त्यासाठी सर्वांनी स्वतःची व आपल्या सहकारी कामगारांची काळजी घेऊन सर्वानी जास्तीत जास्त उत्पादन करण्याचे आवाहन व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले.
फारसा उत्साह नाही
खंडेनवमी हा कामगारवर्गाचा मोठा सण. यादिवशी शहरातील भोसरी, लांडेवाडी, केएसबी चौकात झेंडुच्या फुलांची व हारांच्या विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. यंदा याठिकाणी बसणाऱ्या विक्रेत्यांची संख्या घटली होती. काही ठराविक विक्रेत्यांनीच दुकाने लावल्याचे चित्र होते. त्यामुळे खंडेनवमीचा उत्साह फारसा जाणवला नाही. उद्योगनगरी आणि कामगारनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराच्या केएसबी चौक, लांडेवाडी चौक तसेच औद्योगिक परिसरात दरवर्षी खंडेनवमीला उत्साह ओसंडून वाहत असतो. परंतु शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या साध्या वातावरणात हा सण साजरा करण्यात आला.