मंदी हटविण्याचे साकडे घालत खंडेनवमी साजरी

पिंपरी – झेंडूचे तोरण, अंब्याच्या डहाळ्यांनी सजलेली प्रवेशव्दारे, गालिचा रांगोळीचा सडा, साफसफाई करुन लख्ख केलेली यंत्रसामुग्री, झेंडू व आपट्याची पाने वाहून त्याची केलेली पूजा, मिठाईचे वाटप अशा वातावरणात पिंपरी-चिंचवड कामगारनगरीत आज (सोमवारी) खंडेनवमी साजरी करण्यात आली. कामगारनगरीवरील मंदीचे सावट हटू दे, असे साकडे कामगारांनी यानिमित्ताने घातले.

शहरात सुमारे साडेसहा हजार लहान-मोठे उद्योग आहेत. खंडेनवमीच्या दिवशी कारखान्यांमध्ये यंत्रसामग्रीचे पूजन केले जाते. त्यामुळे शहरात खंडेनवमीला विशेष महत्त्व आहे. उद्योगांवर मंदीचे सावट असले तरी उत्सवाच्या परंपरेत कोणताही खंड पडलेला नाही. सर्वच कारखान्यांमध्ये यंत्रांची पूजा करण्यात आली. कारखान्याच्या प्रवेशव्दारांवर तोरणे लावण्यात आली होती. रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या. फुलांची आरास करुन यंत्रसामग्री तसेच परिसर सजविण्यात आला होता. यंत्रसामग्रीचे पारंपरिक पद्धतीने पूजा करुन मिठाईचे वाटप करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीचा कणा असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या पिंपरी, चिंचवड व चिखली येथील कारखान्यांमध्ये पारंपारिक पद्धतीने यंत्रसामुग्रीची पूजा करीत खंडेनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यात उत्साहाने भाग घेतला. पिंपरी, चिंचवड व चिखली कारखान्यांमध्ये असेंब्ली लाईन्स, ईआरसी, फौंड्री, ट्रेनिंग डिव्हीजन, इंजिन शाप, पी. ई. आदी महत्त्वाच्या ठिकाणी पूजा करण्यात आली.

आकुर्डी येथील बजाज ऑटो कारखान्यात कामगारांनी काम करुन खंडेनवमी साजरी करण्याचा गेली अनेक वर्षे पायंडा पाडला आहे. त्यानुसार यावेळीही कामगारांनी श्रमाच्या स्वरुपात पूूजा बांधली. एसकेएफ कंपनीमध्ये कामगार व व्यवस्थापनाने एकत्र येत यंत्रसाम्रगीची पूजा केली. थरमॅक्‍स, अल्फा लावल, सॅण्डविक एशिया, सेंच्युरी एन्का, ऍटलास कॉप्को आदी कारखान्यांमध्ये यंत्राची पूजा करण्यात आली. काही उद्योगांमध्ये कामगारांना बोनस जाहीर करण्यात आला.

“एचए’चे कामगार गहिवरले –
पिंपरी-चिंचवड कामगारनगरीचा “श्री गणेशा’ करणाऱ्या पिंपरीतील हिंदुस्थान एंटिबायोटिक्‍स (एच.ए.) कंपनीमध्ये खंडेनवमी दरवर्षी उत्साहात साजरी होते. कारखाना आजारी उद्योग म्हणून घोषित झाला आहे. गेली कित्येक वर्षांपासून कामगारांना वेतनासाठी अनेक महिने प्रतीक्षा करावी लागते. मात्र, आज ना उद्या कंपनीचे गतवैभव परत येईल, या आशेवर कामगार दरवर्षी उत्साहात खंडेनवमी साजरे करायचे. परंतु, कंपनीतील कामगारांना नुकतीच स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. रोजगार गमाविण्याच्या भीतीने कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्याचे सावट आजच्या खंडेनवमीच्या कार्यक्रमावर दिसून आले. यंत्रसामुग्रीची पूजा करताना कामगारांना गहीवरुन आले होते.

अनोखी खंडेनवमी – 
पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने सिंहगड एक्‍सप्रेसमध्ये खंडेनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने दररोज चिंचवड ते मुंबई प्रवास करणाऱ्यांनी यामध्ये हिरीरीने सहभाग घेतला. चिंचवड बोगीची सजावट करण्यात आली होती. बोगीत देवीची पूजा करुन प्रवाशांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच रेल्वे रुळ ओलांडू नये, विना तिकीट प्रवास करु नये, अशी जनजागृती यानिमित्ताने करण्यात आली, अशी माहिती इकबाल मुलानी यांनी दिली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.