खंबाटकीतील जुळ्या बोगद्याचे काम जोरात सुरुच

सातारा-पुणे अंतर आणि वेळ दोन्ही वाचणार

– श्रीनिवास वारुंजीकर

पुणे – मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वर पुणे-सातारा दरम्यान मोठे आव्हान असलेला घाट म्हणजे खंबाटकी घाट होय. पूर्वी एकाच रस्त्यावरुन समोरासमोर वाहने येत-जात असताना हा घाट पार करणे मोठेच दिव्य असायचे. वर्ष 2000 मध्ये पंतप्रधानांच्या सुवर्ण चतुष्कोन योजनेत पुणे-सातारा रस्त्याचे चौपदरीकरण झाले आणि त्या दरम्यानच सातारा-पुणे मार्गिकेमध्ये एक दोन पदरी वाहतुकीचा बोगदा बांधण्यात आला. शिवाय पुणे-सातारा मार्गिकेमध्ये चढणीचा मार्ग असलेल्या भागातल्या रस्त्याचे तीन पदरी रुंदीकरणही झाले. त्यामुळे वाहतुक वेगवान तर झालीच, शिवाय वेळही वाचायला लागला आणि अपघाताचा धोकाही टळला.

दरम्यान, सातारा-पुणे नव्या बोगद्याच्या बाहेर अनेक अपघात झाले. बोगदा संपल्यानंतरचे वळण न समजल्याने अनेक वाहने दरीत पडत असत. शिवाय बोगदा संपल्यानंतरचा रस्ता भराव ताकून निर्माण केला गेला होता. या रस्त्यावर बेंगरूटवाडीजवळ एक “एस’ आकाराचे वळण अनेक वर्षे प्राणघातक ठरले आहे. या वळणावर वाहन नियंत्रणात न आणता आल्याने अनेक मोठे अपघात घडले होते, ज्यात प्राणहानीही झाली होती. शिवाय हा रस्ता मुख्य महामार्गाला मिळतो, त्या ठिकाणीही काही अपघात घडले होते.

आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) सातारा-पुणे मार्गिकेमध्ये आणखी एका जुळ्या बोगद्याचे काम वेगात सुरु आहे. हे दोन्ही बोगदे वाहतुकीसाठी खुले झाल्यानंतर विद्यमान घाट रस्ता (पुणे-सातारा) आणि आताचा नवा बोगदा (सातारा-पुणे) वापरण्याची वेळच येणार नाही. हे दोन्ही नवे बोगदे एकमेकांच्या अगदी शेजारी असून दोन्हीतील रस्ता प्रत्येकी तीन पदरी असणार आहे. सातारहून पुण्याला येताना सुरुर कवठे गावाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून डावीकडे जात, हा नवा बोगदा रस्ता तयार होत आहे. एकूण सुमारे 8 किमीच्या या रस्त्यावर दोन्ही बोगदे 800 ते 900 मीटर्सचे असतील.

या नव्या बोगद्यांमुळे अंतर दहा किमीने कमी होणार असून वेळही किमान 15 ते 20 मिनिटांनी वाचणार आहे. बोगदे पुण्याच्या दिशेला आता वापरात असलेल्या रस्त्यावर उघडतील. सुरुर कवठे ते खंडाळा या नव्या मार्गावर एक उड्डाणपूल आणि धोम-बलकवडी कॅनॉलवरील एक पूल असून, संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हे जुळे बोगदे बांधले जात आहेत. करोनाच्या काळातही वेगाने विकासकाम सुरु असल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.