लंडन – ब्रिटनमध्ये खलिस्तानवाद्यांनी पुन्हा एकदा स्वतंत्र खलिस्तानसाठीची निदर्शने केली आहेत. फरार खलिस्तानी नेता अमृतपाल सिंगला पाठिंबाही या निदर्शनांमधून देण्यात आला. अमृतपाल सिंग याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे, असे मानून ही निदर्शने करण्यात आली. याशिवाय भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा वादग्रस्त माहितीपट बीबीसीने प्रदर्शित करावा, अशी मागणीही या निदर्शनांच्या माध्यमातून करण्यात आली.
बीबीसीच्या कार्यालयाच्या बाहेर करण्यात आलेल्या या निदर्शनांच्यावेळी खलिस्तानवाद्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवण्यासाठी काश्मिरी विभाजनवादी या निदर्शनात सहभागी झाले होते. काश्मिरी नेते रेहाना अली यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील माहितीपट प्रदर्शित करण्याची मागणी केली.
लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाच्या बाहेर देखील खलिस्तानी संघटनांनी निदर्शने केली. यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. साऊथहॉल येथील गुरुद्वाराजवळ झालेल्या निदर्शनांच्यावेळी भारतविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली. या घोषणाबाजीला एका भारतीय व्यक्तीने आक्षेप घेतला. त्या व्यक्तीला खलिस्तानवाद्यांनी धक्काबुक्कीही केली.
दोन दिवसांपूर्वी भारतीय उत्तायुक्तालयावरील तिरंगा खलिस्तानवाद्यांनी बळजबरीने उतरवला होता आणि खलिस्तानी झेंडा फडकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने दर्शनी भागात मोठा तिरंगा ध्वज लावला आहे.
भारतातील स्थितीबाबत पसरल्या अफवा…
भारतात पंजाबमधील स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याची अफवा संपूर्ण लंडनमध्ये पसरली होती. ही अफवा भारतीय उच्चायुक्तालयाने फेटाळून लावली आहे. “सनसनाटी पसरवण्यासाठी खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यामध्ये काही तथ्य नाही. ब्रिटनमधून भारतात जाणे असुरक्षित नाही. या संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवण्यात येऊ नये,’ असे लंडनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोरायस्वामी यांनी स्पष्ट केले आहे.