ओटावा, (कॅनडा) – कॅनडाच्या व्हँकूवरमधील रॉस स्ट्रीट गुरुद्वाराची तोडफोड करण्यात आली आहे, असे खालसा दिवाण सोसायटीने म्हटले आहे. खलिस्तानला पाठिंबा देणाऱ्या शीख फुटीरतावाद्यांच्या एका लहान गटावर तोडफोडीचा आरोप करण्यात येतो आहे.
शनिवारी गुरुद्वारात मुर्दाबाद शब्द ग्राफिटीद्वारे लिहिले गेले होते. याची पोलिस चौकशी करत आहेत, असे व्हँकुव्हर पोलिस विभागाचे प्रवक्ते सार्जंट स्टीव्ह एडिसन म्हणाले.
हे कृत्य कॅनेडातल्या शीख समुदायात भीती आणि फूट पाडण्यासाठी केले गेले आहे. या हेतूने सुरू असलेल्या अतिरेकी शक्तींच्या मोहिमेचा हा एक भाग आहे, असे सोसायटीने एका निवेदनात म्हटले आहे.
त्यांच्या कृतींमुळे शीख धर्म आणि कॅनेडियन समाजासाठी पायाभूत असलेल्या समावेशकता, आदर आणि परस्पर समर्थनाच्या मूल्यांना धक्का बसतो, असे निवेदनात म्हटले आहे.
कॅनेडातल्या लोकांना अतिरेकीपणाचा सामना करण्यासाठी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन देखील या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. पोलिसांना संशयित आढळला नाही, परंतु अधिक माहिती नंतर जाहीर केली जाईल, असे देखील एडिसन म्हणाले.