मुंबई – भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसेंच्या निर्णयामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये मेगा भरती केलेल्या भाजपला आता गळती लागणार काय? असा प्रश्न चर्चिला जात आहे. अशातच आता शिवसेनेने भाजपच्या बड्या नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याचं खुलं आमंत्रण दिलं आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर आज शिक्कामोर्तब झाले. राज्यातील या राजकीय भूकंपानंतर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी एबीपी माझा या नामांकित वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना खडसेंच्या निर्णयाचे स्वागत केले. याचबरोबर त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याचं आवाहन करताना शिवसेनेची दारं त्यांच्यासाठी सदैव खुली आहेत असं म्हंटलं.
काय म्हणाले खोतकर?
“भाजपने जे पेरले तेच आता उगवत आहे. मागच्या पाच वर्षात भाजपाने मेगा भरती केली. आता भाजपाला उतरती कळा लागली आहे. एकनाथ खडसेंसारखे मोठे नेते आज राष्ट्रवादी पक्षात जात आहेत. त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आजही भारतीय जनता पक्षात अनेक प्रमुख नेते नाराज आहेत . त्यांनी त्यांच्या बुध्दीप्रमाणे निर्णय घ्यावा आणि पक्षांतर करावे.
“पंकजा मुंडे जर आमच्या पक्षात आल्या तर त्याचा आम्हाला आनंद आहे. त्यांच्यासाठी आमच्या पक्षाची दारे नेहमीच खुली आहेत. मी शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांना विनंती करतो त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश करावा. त्याच काय आणखी कोणी भाजपा नेता, जर आमच्या पक्षात आला तर त्याचा आम्हाला आनंदच आहे, आम्ही त्यांचे स्वागत करू,” असं खोतकर म्हणाले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकांमधील पराभवानंतर पंकजा मुंडे भाजपवर नाराज असल्याचं वृत्त होत. भाजपने मुंडेंना विधानसभेवर घेतलं नसल्याने त्यांची नाराजी अधिकच वाढल्याचं बोललं जात होत. मात्र पक्षाने त्यांना काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान दिल्याने या चर्चा थांबल्या होत्या.