उमेदवार दत्ता बहिरट यांच्या कार्याच्या अहवालाचे प्रकाशन
शिवाजीनगर – खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वसाहतींना बांधकाम करण्यासाठी चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढवून मिळण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन माजी आमदार मोहन जोशी यांनी गुरुवारी येथे दिले. त्याचबरोबर पुणे, खडकी व देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या परिसरात नागरी सुविधा चांगल्या पद्धतीने मिळाव्यात यासाठीही प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (कवाडे गट) उमेदवार दत्ता बहिरट यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन मोहन जोशी यांच्यासह खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते खडकी बाजारात झाले. यावेळी ते बोलत होते. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद, सदस्य पूजा मनीष आनंद, बहिरट, यासिन शेख, मनोज भोरे, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या ब्लॉक समितीचे अध्यक्ष राजेंद्र भुतडा यांच्यासह महाआघाडीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार चव्हाण म्हणाल्या, राज्य सरकारने गतवर्षी कॅन्टोन्मेंट बोर्डातील नागरी सुविधांसाठी दरवर्षी 5 कोटी रुपयांचा विकास निधी देणार असल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात हि केवळ घोषणाच राहिली. राज्य शासनाने नागरी सुविधांसाठी कोणतेही अनुदान दिले नाही. हे अनुदान मिळविण्यासाठी आघाडीचे नेते प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
मनीष आनंद म्हणाले, बोर्डाच्या हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांना घरे बांधण्यासाठी एफएसआय वाढवून मिळावा, यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी बहिरट निवडून आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न केले जाणार असल्याचे आनंद यांनी स्पष्ट केले. त्यानंतर बहिरट यांच्या प्राचारार्थ या भागात पदयात्रा काढण्यात आली. त्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.