निवडणूक काळासाठी केला जाणार होता वापर
पुणे – आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सतत चर्चेत असलेल्या एका राजकीय नेत्याने गुंडांच्या टोळ्यांमध्ये समेट घडवून आणला. संबंधित नेत्याला गुंडांचा वापर निवडणुकीसह जमिनीच्या व्यवहारांसाठीही करायचा होता.
या नेत्याच्या मध्यस्थीने समेट घडल्यावर एकमेकांविरुद्धचे साक्षीदार फितूर होऊन टोळी प्रमुख हळूहळू गुन्ह्यांतून निर्दोष सुटत कारागृहाबाहेर आले. मात्र, “खादी’तील नेत्याने रचलेल्या चालीला “खाकी’ वर्दीने चांगलेच चेकमेट केले आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांनी संबधित टोळी प्रमुखांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांना पुन्हा गजाआड केले आहे.
शहरात एकेकाळी टोळीच्या वर्चस्ववादातून खूनसत्र सुरू झाले होते. यामुळे कायद्याच्या चिंधड्या उडाल्या. परिस्थिती हाताबाहेर जाताच पोलिसांनी टोळी प्रमुखांच्या मुसक्या आवळल्या. गंभीर गुन्ह्यांमध्ये हे टोळीप्रमुख गजाआड झाल्याने गुन्हेगारीला आळा बसला. विशेषत: जमिनी आणि मालमत्ता लाटण्याचे प्रकार नियंत्रणात आले. तर, दुसरीकडे राजकारणातही गुंडांचा वावर कमी झाला होता. मात्र, आता हे गुंड पुन्हा तोंड वर काढत असल्याची स्थिती निर्माण होताच, पोलिसांनी या सराईतांच्या पुन्हा मुसक्या आवळल्या आहेत.
गजा मारणेला भोवली मजा
पुणे ग्रामीण पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी थरारक पाठलाग करत मेढ्याच्या बाजार चौकात कुख्यात गजा मारणे याच्यासह चौघांना ताब्यात घेतले. एका प्रकरणात निर्दोष सुटका झाल्यानंतर गजा मारणेने तळोजा कारागृहातून कोथरुडपर्यंत भव्य रॅली काढली होती. शहरात पुन्हा आपली दहशत असावी, असा त्याच उद्देश होता. पिंपरी-चिंचवड आणि पुणे पोलिसांनी ठिकठिकाणी गुन्हे दाखल करत त्याला वठणीवर आणले होते. त्याच्या समर्थकांवरही गुन्हे दाखल करुन त्यांची आलिशान वाहने जप्त केली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. तर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस गजावर मोक्का लावण्याच्या तयारीत आहेत.
निलेश घायवळही स्थानबद्ध
ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुखही “ऍक्शन मोड’मध्ये आले आहेत. त्यांनी घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळला जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथून अटक केली. त्यालादेखील वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. निलेश घायवळ याच्याविरुद्ध यापूर्वी मोक्का, खून, खंडणी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अभिनव देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत प्रस्ताव पाठवला होता. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यावर निर्णय घेत घायवळला स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. पुणे पोलिसांनी त्याला स्थानबद्धतेतून “मोक्का’च्या गुन्ह्यात अटक केली.
शरद मोहोळ व साथीदारांना पुण्यात प्रतिबंध
गुरूवार पेठ कृष्ण हट्टी चौकात एका संघटनेच्या कार्यक्रमासाठी गुंड शरद मोहोळ त्याचे साथीदारांबरोबर त्या ठिकाणी आला होता. या टोळीने तेथे आरडाओरड केली. त्यामुळे नागरिक घाबरून तेथून निघुन गेले होते. या प्रकरणात 16 जणांना अटक झाली होती. दरम्यान, मोहोळ व त्याच्या इतर तेरा साथीदारांना दोन महिन्यांसाठी पुणे शहरात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.