आपल्या ईश्‍वरासाठी वापरू “आपलीच’ अगरबत्ती

नवी दिल्ली – भारताला रोज 1,490 टन अगरबत्ती लागते. मात्र भारतातील उत्पादन क्षमता केवळ 766 टन आहे. या क्षेत्रात भारताला पूर्णपणे स्वावलंबी बनविण्याचा विडा खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाचे उचलला आहे. 

यासंदर्भात महामंडळाने लघुउद्योग मंत्रालयाला एक प्रस्ताव सादर केला असून याची तात्काळ दखल घेऊन मंत्रालयाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे अर्धशिक्षित आणि अशिक्षित लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकेल. यासंदर्भातील पायलट प्रोजेक्‍ट लगेच सुरू होणार आहे.

या क्षेत्रात अगोदरच कार्यरत असलेल्या छोट्या उद्योजकांना तंत्रज्ञान आणि भांडवली मदत पुरविण्याची ही योजना आहे. या योजनेनुसार महामंडळ स्थानिक उत्पादकांना आधुनिक ऑटोमॅटिक अगरबत्ती उत्पादनाची यंत्रे आणि इतर सुविधा उपलब्ध करून देणार आहे. विशेष म्हणजे ही यंत्रे देशातील उत्पादकांनी तयार करावीत याबाबत महामंडळ आग्रही आहे. त्यासाठी यंत्रसामुग्री उत्पादकांना आवश्‍यक ती मदत करण्यासाठी महामंडळ पुढाकार घेणार आहे.

सरकारने अगरबत्तीला मुक्त व्यापार परवान्यातून बाहेर काढले आहे. आता अगरबत्तीचा समावेश नियंत्रित व्यापार परवान्यात करण्यात आलेला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.