बारामती-इंदापूर रस्त्यावर खड्डेच खड्डे

बांधकाम विभागाचे कामाकडे दुर्लक्ष : अपघातांचे प्रमाण वाढले

भवानीनगर – बारामती-इंदापूर रस्त्याच्या भवानीनगर येथील नीरा डाव्या कालव्याच्या पुलाच्या उतारावर मोठे खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. हे खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे. बारामती-इंदापूर हा पालखी मार्ग नव्याने मोठा होणार असल्याचे सर्वजण रोज ऐकत आहेत. हा रस्ता नवीन होईल तेंव्हा होईल. परंतु, सध्या या रस्त्यावरील खड्डे बुजविणे गरजेचे आहे. पिंपळी ते भवानीनगर ते सणसर येथील रस्त्यांची अवस्था खराब झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत.

भवानीनगर येथील नीरा डाव्या कालव्याच्या पुलावरील उतराच्या खाली मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने येथे अपघात होऊन त्यात काहींचा मृत्यूही झालेला आहे. वाहन चालकांना तसेच काही वाहन चालक खड्डा चुकविताना अपघात होऊन गंभीर जखमी झालेले आहेत. एवढ्या वेळा याठिकाणी अपघात होऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग कायम या रस्त्याच्या कामाकडे डोळेझाक करीत आहे.

खड्डे पडले की, तात्पुरती मलमपट्टी केली जाते. पुन्हा हेच खड्डे महिन्यातच आहे त्यापेक्षाही मोठे खड्डे बनलेले दिसतात. हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. बारामती-इंदापूर रस्त्यावरील पिंपळी ते भवानीनगर रस्त्यावर कायमच मोठ-मोठे खड्डे पडलेले असतात. मात्र, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कधीच गांभीर्याने लक्ष देत नाही. या खड्यांमुळे वाहनांचेही नुकसान होत आहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी श्री छत्रपती साखर कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब सपकळ यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.