कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजवा

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नगराध्यक्षांना निवेदन
कोपरगाव – शहरात मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे अपघातांना निमंत्रण देत असून, ते तातडीने बुजवावेत, अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील मुख्य रस्ता साईबाबा कॉर्नर ते जब्रेश्वर मंदिर, सुदेश चित्रमंदिर ते एस. जी. विद्यालय, बॅंक रोड, धारणगाव रोड, येवला नाका ते अण्णाभाऊ साठे चौक व गोदावरी पेट्रोल पंप ते संभाजी चौक, इंदिरापथ आदी मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर लहान-मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांचा शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे खड्डे चुकवित असताना वाहनधारकांची तारांबळ उडत आहे.

या मुख्य रस्त्यांवर कायमस्वरूपी वाहनधारक व पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असल्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. कोपरगाव शहरात झालेल्या पावसाचे प्रमाण कमी असून, या कमी पावसातच शहराच्या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे नगरपरिषदेने मुख्य रस्त्यांवर पडलेल्या या खड्ड्यांची गांभीर्याने दखल घेऊन ते बुजवावेत अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदन कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी स्वीकारले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, वाल्मीक लाहिरे, एकनाथ गंगुले, हृषीकेश खैरनार, प्रसाद उदावंत, चंद्रशेखर म्हस्के, समीर शेख, संतोष नजन, संतोष दळवी, सिद्धार्थ खडांगळे, कमलेश जाधव, हर्षल जैस्वाल, आनंद जगताप, दादा पोटे, युसूफ शेख आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.