– भाजपातील नाराजी आणि गटबाजी चव्हाट्यावर
– खडसेंच्या मुलीला मिळाली उमेदवारी
– बावनकुळेंच्या पत्नीने भरला अपक्ष उमेदवार अर्ज
मुंबई : भाजपाचे वरिष्ठ नेते व जमिन व्यवहाराप्रकरणी मंत्री पदावरून पायउतार झालेले माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याबरोबरच उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व विधानसभेतील भाजपाचे मुख्य प्रतोद राज पुरोहित यांचा भाजपाने विधानसभा निवडणूकीतून पत्ता कट केला आहे. शुक्रवारी जाहिर केलेल्या अखेरच्या उमेदवारांच्या यादीत या नेत्यांची नावे नसल्याने पक्षाने त्यांना निवडणूकीच्या मैदानातून डच्चू दिल्याचे आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारीवरून भाजपात नाट्य रंगल असून बोरिवली येथे तावडेंच्या समर्थनार्थ समर्थकांनी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. तर घाटकोपरमध्ये प्रकाश मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी राडेबाजी करीत उमेदवार पराग शाह यांच्या गाडीची तोडफोड केली. त्यामुळे घाटकोपरमध्ये तणावाचे वातारवण पसरले होते.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यापार्श्वभूमिवर भाजपाने शुक्रवारी आपली अखेरची यादी जाहिर केली. भाजपाने वेटिंगवर ठेवलेल्या एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे व राज पुरोहीत यांच्यासह अनेक निष्ठावंत आमदारांना यंदाच्या विधानसभा निवडणूकीतून डच्चू दिला आहे. उमेदवारीवरून भाजपात चांगलेच नाट्य रंगले असून पक्षातील नाराजी आणि गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
बोरिवली मतदारसंघातून विनोद तावडे यांच्याऐवजी सुनील राणे यांना तर कुलाबा येथे राज पुरोहित यांना वगळून विधानपरिषदेचे सभापती रामराज निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुनील राणे हे शैक्षणिक संस्थाचालक असून त्यांच्या उमेदवारीला तावडे समर्थकांनी विरोध करीत जोरदार घोषणाबाजी केली. तावडे यांना उमेदवारी मिळू नये यासाठी त्यांच्या विरोधकांनी जोरदार लॉबिंग केल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ खडसे पुन्हा विधानसभेत नको याची पुरेपूर काळजी घेत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. उमेदवारी नाकारल्यामुळे माझा गुन्हा काय, असा सवाल करणाऱ्या खडसे यांनी अखेरच्या क्षणी आपली तलवार म्यान करीत पक्ष जो आदेश देईल त्याचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाने मुक्ताईनगर मतदारसंघातून त्यांची मुलगी रोहीणी खडसे यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपाने नागपूरच्या कामठी मतदारसंघातून उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याऐवजी जिल्हा परिषद सदस्य टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बावनकुळे यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नीला तिकिट देणार अशी चर्चा होती. त्यामुळे पक्षाची निरोपाची वाट पाहून अखेर बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला. त्यांच्या अपक्ष उमेदवारी अर्जामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.