पुणे: खडकवासला येथे खंडणीच्या कारणावरुन गोळीबार केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार मामा गॅंगच्या म्होरक्या चेतन लिमण याच्यासह चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 पिस्टल आणि 9 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
टोळीप्रमुख चेतन ऊर्फ मामा गोविंद लिमण (वय 28, रा. खडकवासला), किरण महेंद्र सोनवणे (वय 23, रा. किरकटवाडी, ता हवेली) आणि दिगंबर दीपक चव्हाण (वय 21, रा. किरकटवाडी, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
राजू सोनवणे हा व्यावसायिक असून त्याच्याकडे चेतन लिमण हा गुन्हेगार 4 महिन्यांपासून जबरदस्तीने खंडणी वसुल करीत होता. लॉकडाऊनमध्ये चेतन याने तिघांना पाठवून 50 हजार रुपयांची खंडणी मागितली होती. पण कामधंदा नसल्याने सोनवणे यांनी पैसे देण्यास नकार दिला होता. सोनवणे यांच्याकडे
17 मे रोजी विजय चव्हाण हे आले होते. रात्री ते घराबाहेर बोलत थांबले असताना मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी त्यांच्या दिशेने 10 गोळ्या झाडत अंधाधुंद गोळीबार केला. त्यातील गोळी चव्हाण यांना लागली व ते गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत होती. तपासादरम्यान हे आरोपी डोणजे भागात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, सहायक फौजदार दत्तात्रय जगताप, पोलीस नाईक राजू मोमीन, अमोल शेडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी डोणजे भागात त्यांचा शोध घेऊन तिघांना जेरबंद केले.