पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – खडकवासला धरणाजवळ असलेल्या सात ते आठ गावांना महापालिका पाणी शुद्ध न करताच थेट धरणातून घेतलेले पाणी देते. परिणामी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गढूळ व दुर्गंधी असलेले पाणी या नागारिकांना प्यावे लागते. या गावांसाठी महापालिकेकडून सुमारे १७० एमएलडी क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे.
त्यासाठी धरणालगत असलेल्या पाटबंधारे विभागाच्या जागेची मागणी महापालिका करणार आहे. या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा पुढील आठ दिवसांत तयार केला जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
धायरी (उर्वरीत भाग), खडकवासला, नांदेड, नांदोशी, नऱ्हे, खडकवासला या गावांना महापालिका थेट धरणातील पाणी देते. त्यानंतर ग्रामपंचायती हे पाणी या गावांना देत होत्या. मात्र, ही गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतरही त्याच पद्धतीने पाणी दिले जात आहे. हे गाळमिश्रीत पाणी दैनंदिन वापरातही येत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
याबाबत महापालिकेत अनेक तक्रारी आलेल्या आहेत. दरम्यान, पावसाच्या पाण्यात वाहून आलेली माती तळाला जाण्याआधीच धरणातून पाणी सोडण्यात येते. त्यामुळे पाण्यासोबतच गाळ येत असल्याने नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती.
त्यानंतर आयुक्तांनी मागील आठवड्यात या तक्रारींचा आढावा घेतल्यानंतर या गावांसाठी नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागास केल्या होत्या. त्या अनुषंगाने पाणीपुरवठा विभागासाठी नेमण्यात आलेल्या प्रायमूव्ह या संस्थेच्या माध्यमातून हा अहवाल तयार करण्यात येत आहे.
या गावांना होणार फायदा
– धायरी (उर्वरीत भाग), खडकवासला, नांदेड, नांदोशी, नऱ्हे, किरकटवाडी, सणसवाडी या गावांसह उत्तमनगर आणि शिवणे, न्यू शिवणे गावांचीही वाढीव पाण्याची मागणी असल्याने त्यांनाही या नवीन जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी देण्याचे नियोजन महापालिका प्रशासन करणार आहे.
धरणालगतच असलेल्या उजव्या बाजूच्या जागेची मागणी महापालिकेने केली होती. मात्र, या ठिकाणी बंद कालव्याचा प्रकल्प असल्याने एनडीएच्या बाजूला असलेली जागा देण्याची तयारी पाटबंधारे विभागाने दर्शविली आहे.