आता प्रतीक्षा मनसेच्या उमेदवाराची
खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा युतीचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, यावर्षीची लढत पाहता बालेकिल्ल्यावर कोण झेंडा फडकवणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे. महायुतीकडून विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सचिन दोडके यांना उमेदवारी देण्यात आली असून, आता मनसेकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
खडकवासला मतदारसंघात शहर आणि ग्रामीण दोन्ही भाग येत असल्यामुळे काही ठिकाणी महायुती तर काही ठिकाणी राष्ट्रवादीसाठी “सेफ झोन’ असलेला हा मतदारसंघ आहे.
दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने बाजी मारली. त्यानंतर सलग दोन वेळा भाजपने हा गड राखून ठेवला आहे. यावेळी भीमराव तापकीर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून, राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत महायुतीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, बुधवारी (दि.2) सकाळीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरसेवक सचिन दोडके यांना एबी फॉर्म देत उमेदवारी जाहीर केले. तर मनसेकडून दुसरी यादी जाहीर झाली.
परंतु त्यामध्ये खडकवासलातील उमेदवाराचे नाव नाही. त्यामुळे लढतीतील तिसरा उमेदवार कोण असणार? का, महायुती विरोधात आघाडी अशी लढत पाहायला मिळणार, हे पुढील 24 तासांत स्पष्ट होईल. दरम्यान, शिवसेनेकडून रमेश कोंडे हे उमेदवारी अर्ज भरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यांनी अर्ज भरला तर कोण कोणाची मते खाणार, याचे गणित सगळ्याच उमेदवारांना करावे लागणार आहे.