‘खडकवासला’ तळाला; फक्‍त 10% पाणी

शहरासह पालख्यांसाठी पाणी वापराचे नियोजन

पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पामध्ये अवघा 2.93 टीएमसी म्हणजे 10 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अर्धा टीएमसी इतका पाणीसाठा कमी आहे. सध्या उपलब्ध असलेले 2.93 टीएमसी पाणी दि.31 जुलैपर्यंत शहराला पिण्यासाठी तसेच येणाऱ्या पालख्यांसाठी आणि आकस्मिक तरतुदीसाठी राखीव असे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या चारही धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच याच धरणांतून शेतीसाठी आवर्तनही सोडण्यात येते. सध्यस्थितीत खडकवासला धरणात 0.62 टीएमसी, पानशेत धरणात 1.53 टीएमसी, वरसगाव धरणात 0.78 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. जूनमध्ये संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे शहरातून पुढे जाणार आहेत. पुणे शहर, हडपसर, फुरसुंगीपासून पाटसपर्यंत वारकऱ्यांना कालव्यातून पाणी दिले जाते, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.

मागील वर्षी समाधानकारक पावसामुळे टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणे 100 टक्के भरली. जुलै ते ऑगस्ट 2018 दरम्यान खडकवासला धरणातून सुमारे 19 टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. मात्र, परतीच्या पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली. धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा आणि ग्रामीण व शहरी भागात पाण्याची वाढती मागणी, यामुळे पाण्यावरून वादंग निर्माण झाले होते. धरणे भरूनही शहराला मिळणाऱ्या पाणीसाठ्यामध्ये कपात करण्याची सूचना पाटबंधारे विभागाने केली होती. शहराला रोज दोनवेळा पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे 1,350 एमएलडी इतक्‍या पाण्याची आवश्‍कता भासते. अशातच 200 एमएलडी इतके कमी पाणी उचलावे. शहराच्या पाण्यात कपात करून ते पाणी शेतीला द्यायचे असल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे होते. त्यानुसार शेतीला आर्वतन देण्यात आले.

टेमघर धरण शून्यावर
टेमघर धरणाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने टेमघर धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडण्यात आले. त्यामुळे टेमघर धरण लवकर रिकामे करण्यात आले. त्यामुळे टेमघर धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे.

खडकवासला
0.62 टीएमसी पाणीसाठा


पानशेत
1.53 टीएमसी पाणीसाठा


वरसगाव
0.78 टीएमसी पाणीसाठा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.