भाजपच्या तंबूत खदखद

संग्रहित छायाचित्र....

स्वीकृतच्या निवडीवरून वाढला पेच भाजपच्या तंबूत खदखद

सातारा –
आगामी विधानसभा निवडणुकांच्या राजकीय गोळाबेरीजमध्ये छोट्या मोठ्या निवडीसुध्दा वादाच्या ठरू लागल्या आहेत. बुथमजबुती हा अजेंडा भाजपने ठेवल्याने सातारा पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकाची निवड थेट चंद्रकांत पाटील यांच्या कोर्टात गेली आहे. स्वीकृतच्या निवडीवरून भाजपच्या तंबूत अंतःस्थ खदखद सुरू झाली आहे.

निष्ठावंतांच्या आडून विरोधाच्या खेळ्या करणारे गट सक्रीय झाल्याने पक्षश्रेष्ठीचा पेच वाढला आहे. केंद्रात व राज्यात शत प्रतिशत भाजप हा नारा असताना सातारा जिल्ह्यात नव्यानेच राजकीय बाळसं धरणाऱ्या भाजपला अंर्तगत नाराजीचा भयंकर सामना करावा लागत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात भाजपने इनकमिंगचे धोरण ठेवल्याने मूळच्या निष्ठावंतांची अडचण वाढली आहे. आता सातारा पालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी राजकीय खदखद सुरू झाली असून याची सोडवणूक जिल्हाध्यक्ष नाही तर थेट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील करणार आहेत. येत्या आठ दिवसांत सातारा पालिकेचा विषय समित्यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर होत असून त्याचवेळी स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी जाहीर केल्या जाणार आहेत.

कार्यकर्त्यासाठी पदे की पदासाठी कार्यकर्ते विषय वरकरणी साधा दिसत असला तरी अंतर्गत राजकारणाचे ताल प्रचंड आहेत. स्वीकृत नगरसेवकांची जबाबदारी पार पाडताना गेल्या अडीच वर्षात कोणत्याही स्वीकृतचा प्रभाव पडला नाही. सागर पावशे यांनी सभागृहात कधीच तोंड उघडले नाही. मात्र त्यांना अनेकांनी प्रायोजक करून बरीच कामे साधून घेतली. त्याचा उत्तम नमुना पारंगे चौकात पहायला मिळतो.

खिशाला बरीच चाट दिल्यावर मग सागर पावशे यांना स्वीकृत नगरसेवक पद मिळाले. मात्र त्यांनी भाजपच्या जाहीर कार्यक्रमात मिरवण्याचे काम केले त्याचा पक्षबांधणीला काही उपयोग झाला नाही. ऍड. प्रशांत खामकर यांनी सत्ताधारी साविआला वर्षभराच्या कारकिर्दीत लढत दिली. मात्र त्याची दखल अभावानेच घेण्यात आली. त्यामुळे पदाला लायक कार्यकर्ते नाही ही परिस्थिती मागे पडून कार्यकर्त्यांसाठी हा समज प्रचलित झाला आहे. आता माजी शहराध्यक्ष सुनील कोळेकर, धीरज घाडगे, महेंद्र कदम, अप्पा कोरे, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार या नावांची स्वीकृतसाठी चर्चा सुरू झाली आहे. या सर्व नावांचे फॉर्म चंद्रकांतदादांकडे रवाना झाल्याचे वृत्त आहे.

सुनेषा शहा यांचेसुद्धा नाव अचानक वर आले आहे. काही नावे कधीच दिसली नाहीत आणि जी होती त्यातील काहींना रितसर पोलीस स्टेशन दाखवण्यात आले, आणि काहींचा उत्साह नेत्यांच्या मागे उभे राहून फोटो सेशन करण्यात उतू गेला. काहींनी मात्र वृक्ष समितीत राहून पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडायचे काम केले. यामध्ये बलशेटवार आणि विकास गोसावी यांची नावे समोर येतात यात गोसावींच्या नावाला झुकते माप असल्याची चर्चा आहे. मात्र आम्ही निष्ठावंत म्हणणाऱ्यांचे गळे सुकले नसल्याने चंद्रकांतदादांनी चाणाक्षपणे हा विषय सध्या तरी प्रलंबित ठेवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)