खबडी डोंगरावरील धबधबे पर्यटकांसाठी आकर्षण

अणे – नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या उंचखडक (ता. जुन्नर) खबडी डोंगरदऱ्यातील धबधबे पावसाने खळाळून वाहत आहेत. याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आणि ट्रेकर्सचा ओघ वाढला आहे.

जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागात अणे घाटात असणारा धबधबा तसेच उंचखडक (खबडी) परिसर निसर्ग सौंदर्याची अलौकिक देण आहे. गेल्या काही दिवसांपासून रिमझिम कोसळणाऱ्या पावसामुळे खबडी शिवारात भरलेल्या आनंद वन तलावासह काळभैरवनाथ मंदिर परिसरातील धबधबे शतजलधारांनी कोसळत आहेत. हे धबधबे पर्यटकांना साद घालत आहेत. गेल्या आठवड्यात रिमझिम पावसामुळे उंचखडक (खबडी) परिसरातील धबधबे डोंगर कड्यांवरून ओसंडून वाहत आहेत. राजुरीपासून उत्तरेला अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या उंचखडक (खबडी) परिसरातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या डोंगरावरील धबधबा पांढऱ्या शुभ्र जलधारांनी ओसंडून वाहत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या परिसरात काळभैरवनाथ मंदिर, आनंदवन तलाव आदी पर्यटन स्थळ असून त्यात हरीण, काळविटाचे कळप, मोर, लांडगे, कोल्हे अन्य वन्यजीव प्राणी पावसाळ्यात पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढते.

खबडी येथील धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी येथे मोठ्या संख्येत पर्यटक येतात. धबधब्याच्या दिशेने जाणारी वाट मात्र काहीशी बिकट आहे. ती पार करून हौशी पर्यटक दरवर्षी धबधब्याकडे पोहोचतात. येथील धबधबा मनोहारी असला तरी पाणी मात्र खोल आहे. या ठिकाणी पर्यटक पाण्यात उतरण्याचा मोह आवरून धबधब्याचे मोहमयी नेत्रसुख घेण्यात धन्यता मानतात.

कसे जाल?
या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींनी पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाटा येथे आल्यानंतर कल्याण-अहमदनगर महामार्गाने अहमदनगरच्या दिशेने सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या राजुरी गावात यावे लागेल, नंतर राजुरी गावच्या उत्तरेला असलेल्या उंचखडक गावात यायचे, तेथे आल्यानंतर उत्तरेला पाहिल्यानंतर खबडी डोंगरावर निसर्ग सौंदर्य आपणास नजरेत पडेल, त्याठिकाणी जावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)