केशवनगर येथे थेट नदीतच अनधिकृत दोन बंधारे?

पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष; तुंबलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा त्रास

हडपसर – केशवनगर (मुंढवा) येथे एका बांधकाम व्यावसायिकाने थेट मुळा, मुठा नदीतच अतिक्रमण करून मुरूम व मातीचा भराव टाकून दोन बंधारे बांधले आहेत. त्यामुळे पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन जलपर्णी वाढली आहे. त्याचबरोबर डासांचा प्रादुर्भाव वाढला असून रोगराई पसरली आहे.

आतापर्यंत कालवा, ओढा किंवा नदी पात्राच्या कडेला अतिक्रमण होताना पाहिले असेल, मात्र केशवनगर येथे थेट नदीतच नदीपात्राच्या सत्तर टक्‍के भागापर्यंत मुरूम व मातीचा भरावा घालून दोन बंधारे घालण्यात आले आहेत. बांधकाम साईटवर पाणी वापराच्या उद्देशाने एका बांधकाम व्यावसायिकाने हे दोन बंधारे घातल्याचे बोलले जात आहे. पाटबंधारे विभाग व महापालिकेने येथे लक्ष देऊन काम थांबवावे, अशी मागणी नागरिकांनी मुख्य अभियंता पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

केशवनगर येथे महापालिकेने नदीवर जॅकवेल बंधारा बांधला आहे. त्याच्या प्रवाहाच्या वरच्या बाजूला नदीच्या पात्राच्या सत्तर टक्‍के भागात मातीचा व मुरमाचा भराव टाकून हे दोन बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यात साठलेले पाणी वीजपंपाद्वारे बांधकामासाठी वापरण्यात येत आहे. बंधाऱ्यामुळे पाण्याचा फुगवटा मुंढवापर्यंत गेला आहे. त्यामुळे केशवनगर, मुंढवा, खराडी परिसरात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे.

वाढलेल्या जलपर्णीमुळे डासांची निर्मिती होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, पाणी साठल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नदीपात्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असताना संबंधित अधिकारी का दुर्लक्ष करत आहेत, असा प्रश्‍न उपस्थित केला जात असून याप्रकरणी चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी केशवनगर ग्रामपंचायत सदस्य रमेश राऊत यांनी पाटबंधारे विभागाला निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, याबाबत पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.