कोची – केरळमधील आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था इतर राज्यांपेक्षा चांगली आहे. तथापि, प्रजनन दराच्या बाबतीत केरळबद्दल बरीच चिंता व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्षात, १९९१ मध्ये राज्याची लोकसंख्या २ कोटी ९० लाख होती. त्याच वेळी २०२४ मध्ये अंदाजे लोकसंख्या ३ कोटी ६० लाख आहे, म्हणजेच ३५ वर्षांत या राज्यातील लोकसंख्या केवळ ७० लाखांनी वाढली आहे.
एका प्रख्यात माध्यमाच्या वृत्तानुसार, करोना विषाणूच्या साथीनंतर केरळमध्ये लोकसंख्या ही चिंतेचा विषय बनला आहे. करोना साथीपूर्वी दरवर्षी ५,००,००० ते ५,५०,००० बाळांचा जन्म होत होता. मात्र करोना काळानंतर २०२३ मध्ये राज्यात फक्त ३,९३,२३१ बाळांचा जन्म झाला. हा राज्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे.
लोकसंख्या शास्त्रज्ञांच्या मते, सध्याची लोकसंख्या पातळी राखण्यासाठी २.१ प्रजनन दर आवश्यक आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक महिलेने किमान २.१ मुलांना जन्म दिला पाहिजे. केरळने १९८७-८८ मध्ये हे लक्ष्य साध्य केले. केरळमधील जवळजवळ १०० टक्के प्रसूती रुग्णालयात होतात. राज्यात चांगली आरोग्य व्यवस्था आहे, बालमृत्यू दर युरोपीय देशांच्या तुलनेत कमी आहे. केरळचा बालमृत्यू दर हजार जन्मांमागे फक्त सहा आहे, जो राष्ट्रीय सरासरी ३० पेक्षा खूपच कमी आहे. अनेक तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मते, गेल्या तीन दशकांपासून केरळची लोकसंख्या स्थिर आहे.