Kerala Explosion : केरळमधील पूरम उत्सवापूर्वी त्रिशूर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी एका फटाका बनवणाऱ्या कारखान्यात झालेल्या प्रचंड स्फोटाने मोठी खळबळ उडाली आहे. या भीषण दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. (Kerala Explosion) यातील अनेकांना भाजल्यामुळे गंभीर दुखापती झाल्या असून, काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्रिशूरमधील जगप्रसिद्ध पूरम (जत्रा) येत्या 26 तारखेला होणार आहे. त्याआधी झालेल्या या स्फोटामुळे संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर गेली आहे. त्रिशूरमधील मुंदथिकोड येथील एका फटाका निर्मिती केंद्रात दुपारी 3.35 च्या सुमारास हा स्फोट झाला. हा कारखाना कापणीनंतर सुकलेल्या भातशेतीच्या मध्यभागी होता. (Kerala Explosion) सध्या केरळमध्ये कडक उन्हाळा असून या प्रचंड उष्णतेमुळे स्फोटाची तीव्रता अधिक वाढल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी झाली असून घटनास्थळावरून आणखी पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच वडक्कनचेरी, कुन्नमकुलम आणि त्रिशूर येथील अग्निशमन दलाची वाहने तसेच रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या. मात्र कारखान्यात मोठ्या प्रमाणावर स्फोटक साठा असल्याने आणि अजूनही छोटे-मोठे स्फोट होण्याची शक्यता असल्याने बचाव पथकांना मुख्य केंद्रापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत होत्या. (Kerala Explosion) कुन्नमकुलम अग्निशमन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, साठवलेल्या साहित्याचे प्रमाण नेमके किती आहे हे अद्याप अस्पष्ट असून पुढील स्फोटांचा धोका कायम आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच जखमींना सर्वतोपरी वैद्यकीय मदत पुरवण्याचे निर्देश दिले असून, बचाव आणि मदत कार्ये समन्वित पद्धतीने पार पाडली जातील याची खात्री करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Kerala Explosion)