थिरूवनंतपुरम – महामारीच्या काळात लघुउद्योजकांचे व शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान झाल्याने केरळ सरकारने आपल्या राज्यातील या क्षेत्रातील लोकांसाठी पाच हजार कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे.
अर्थमंत्री के. एन. बालगोपाल यांनी आज विधानसभेत हे एकूण 5650 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. या मागे राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा विचार असल्याचे सरकारने नमूद केले आहे. त्या खेरीज अडचणीत आलेल्या व्यावसायिकांना व लघुउद्योजकांना कर्ज सवलतही जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजाचे चार टक्के व्याज सरकार भरणार आहे. ही मुदत सहा महिन्यासाठीच असणार आहे.
सरकारी जागांमध्ये ज्या व्यापाऱ्यांची किंवा व्यावसायिकांची दुकाने आहेत त्यांना यावषी जुलै ते डिसेंबर या सहा महिन्याच्या अवधीतील भाडेही माफ केले जाणार आहे. छोट्या व लघुउद्योजकांना त्यांच्या इमारतीवरील करही सहा महिन्यांसाठी माफ केला जाणार आहे.करोना महामारीच्या काळात केरळ सरकारने जाहीर केलेले हे तिसरे पॅकेज आहे.