कोची/नवी दिल्ली – दुबईतून कारभार पाहणाऱ्या केरळ सोने तस्करी प्रकरणाचा सूत्रधार रबिन्स के हमीद याला भारतात राष्ट्रीय तपास यंत्रणेने सोमवारी आणले. कोची विमान तळावरून त्याला ताब्यात घेण्यात आले.
या सोने तस्करी प्रकरणात हमीद (वय 42) हा मुळचा एर्नाकुलमचा रहिवासी मुख्य सूत्रधार आहे. राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सामानासह अन्य मार्गाने तो सोने भारतात पाठवत असे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने ऑगस्ट महिन्यात त्याची तेथे चौकशी केली होती. त्यात त्याचा या प्रकरणातील सहभाग निश्चित करण्यात आला होता.
काही महिन्यापुर्वी संयुक्त अरब अमिराती प्रशासनाला त्याच्या हस्तांतरणासाठी पुरावे सादर करण्यात आले होते. त्याला ताब्यात घेण्यसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक काही दिवसांपुर्वी दुबईला रवाना झाले होते. त्याला येथे आणल्यानंतर कोची विमानतळावर त्याल अटक करण्यात आली. त्रिवेंद्रम विमानतळावर पाच जुलै रोजी 30 किलो सोने जप्त करण्यात आले होते. त्याची अंदाजे किंमत 14. 82 कोटी रुपये होती. या प्रकरणात आतापर्यंत दोन डझन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.