Binil T.B. death in Russia-Ukraine Conflict: रशिया आणि युक्रेनमधील दीर्घकाळ चाललेल्या युद्धात केरळमधील एका युवकाचा मृत्यू झाला असून त्याचा नातेवाईकही गंभीर जखमी झाला आहे. बिनील टीबी (वय३२) असे मृताचे नाव आहे. बिनील टीबी केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथील रहिवासी होते. जैन टीके (२७) असे जखमीचे नाव असून तोही त्याच भागातील रहिवासी आहे.
काही दिवसांपूर्वी बिनीलच्या कुटुंबीयांना ड्रोन हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळाली होती, मात्र कुटुंबीय त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत.
बिनील आणि जैन यांचे नातेवाईक सनिश यांनी माध्यमांना सांगितले की, “बिनीलची पत्नी जोसी मॉस्कोमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे आणि त्यांना ही माहिती मिळाली आहे. अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की बिनिल मरण पावला असून रशियन सैन्याने त्यांना ही माहिती दिली आहे.
घरी येण्यासाठी खूप प्रयत्न करत होते –
गेल्या काही महिन्यांपासून बिनील आणि जैन घरी परतण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. गेल्या महिन्यात बिनीलने अनेक व्हॉईस मेसेज पाठवले होते. त्यामध्ये बिनिलने सांगितले होते की, मायदेशी परतण्यासाठी सप्टेंबरपासून मॉस्कोमधील भारतीय दूतावासाकडे दाद मागितली होती, पण यश मिळाले नाही.
केरळमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणाऱ्या बिनीलने सांगितले होते, “आम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकलो आहोत. आम्ही युक्रेनच्या रशियन-व्याप्त भागात आहोत. आमचे कमांडर सांगतात की हा करार एका वर्षासाठी होता. आमच्या सुटकेसाठी आम्ही स्थानिक कमांडर्सकडे विनवणी करत आहोत. भारतीय दूतावासाच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत रशियन सैन्य आम्हाला सोडत नाही तोपर्यंत ते आम्हाला मदत करू शकत नाहीत. दूतावास म्हणतो की आम्हाला रशियन प्रदेशात परत आणले पाहिजे.”
केरळमधील आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता –
बिलिन हे रशियन सैन्यासाठी लढताना मरण पावलेले केरळमधील दुसरे व्यक्ती आहेत. मिलिटरी सपोर्ट स्टाफच्या नोकरीच्या नावाखाली त्याला रशियन सैन्यात भरती करण्यात आले होते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये संदीप नावाच्या व्यक्तीचाही ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला होता. संदीप हा देखील त्रिशूरचा रहिवासी होता.
बिनील आणि जैन हे भारतीय तरुणांपैकी होते जे गेल्या वर्षी एप्रिलमध्ये रशियाला गेले होते आणि त्यांनी लष्करी सपोर्ट स्टाफमध्ये इलेक्ट्रिशियन, कुक, प्लंबर आणि ड्रायव्हर म्हणून काम करण्याची आशा व्यक्त केली होती. मात्र त्याऐवजी त्यांचे भारतीय पासपोर्ट काढून घेण्यात आले. त्यांना कायमस्वरूपी रहिवासी होण्यास, रशियन सैन्यात भरती होण्यास आणि युद्धात आघाडीवर काम करण्यास भाग पाडले गेले.
NORKA ROOTS या राज्य सरकारच्या अनिवासी केरळींसाठी एजन्सी चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कोलास्सेरी म्हणाले, “गेल्या काही महिन्यांपासून, आम्ही त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करत होतो, केरळमधील किती लोक अजूनही रशियन सैन्याच्या जाळ्यात अडकले आहेत, याची माहिती नाही. त्यांनी सांगितले की, हे लोक आम्हाला काही अडचणीच्या वेळी फोन करतात तेव्हा अशा घटनांची माहिती मिळते”