पक्षाच्या बैठकीत नेतेपदी निवड
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या नेतेपदी विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीच पुन्हा निवड झाली. मुख्यमंत्र्यांच्या सिव्हील लाईन्स येथील निवासस्थानी आज पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली त्यात त्यांच्या निवडीचा प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला. त्यानंतर केजरीवालांनी नायब राज्यपाल अनिल बैजली यांचीही भेट घेतली.
या निवडीमुळे ते आता राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा रितसर दावा करू शकणार आहेत. येत्या 16 फेब्रुवारी रोजी रामलिला मैदानावर त्यांचा शपथविधी होणार आहे. दिल्ली विधानसभेच्या काल झालेल्या मतमोजणीत या पक्षाला दणदणीत बहुमत मिळाले असून त्यांनी दिल्लीतील 70 पैकी 62 जागा मिळवल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला आठ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. आज पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक अत्यंत उत्साहात पार पडली. नवनिर्वाचित आमदारांनी एकमेकांना शुभेच्छा देत राज्यातील जनतेचेही आभार मानले.