कन्हैयाकुमार यांच्या विरोधातील खटल्याला अनुमती देण्यास घेतला आक्षेप
नवी दिल्ली – दिल्लीतील केजरीवाल सरकारने विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार आणि अन्य नऊ जणांवर राजद्रोहाच्या कलमांखाली खटला दाखल करण्यास अनुमती दिल्याने त्यावर ज्येष्ठ कॉंग्रेस नेते चिदंबरम यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. राजद्रोहांच्या कलमांबाबत केजरीवाल सरकारही मोदी सरकारपेक्षा कमी अज्ञानी नाही असे त्यांनी म्हटले आहे.
चार वर्षापुर्वीच्या प्रकरणात केजरीवालांच्या सरकारने जेएनयुचा माजी विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार आणि त्यांच्या नऊ साथीदारांवर खटला चालवण्यास अनुमती दिली आहे. ही अनुमती चार वर्षे केजरीवाल सरकारने रोखून धरली होती. त्यावरून भाजपने केजरीवाल सरकारवर सतत टीका चालवली होती. पण काल अखेर या सरकारने ती अनुमती दिली आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका कार्यक्रमावेळी झालेल्या गोंधळाच्या अनुषंगाने पोलिसांनी कन्हैया कुमारवर गुन्हा दाखल करून त्याच्या विरोधात खटला चालवण्यास दिल्ली सरकारकडे अनुमती मागितली होती. त्या संबंधात चिदंबरम यांनी म्हटले आहे की कन्हैयाकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात लकम 124 ए आणि कलम 120 बी अन्वये खटला दाखल करण्याच्या निर्णयाचा मी विरोध करतो.