नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुलीची फसवणूक केल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. साजीद (राहणार हरियाना), कपिल आणि मानिंवंदरसिंह (मथुरा) अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. तथापि या प्रकरणात वारीस नावाचा इसम मुख्य आरोपी असून तो मात्र अजून फरारी आहे.
केजरीवालांच्या मुलीने ई कॉमर्सच्या एका साईटवर सोफा विक्रीसाठी जाहीरात दिली होंती. तो खरेदी करण्यासाठी म्हणून या आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांची 34 हजार रूपयांची फसवणूक केली असा हा प्रकार आहे. जे तीन आरोपी अटक केले आहेत ते वारीस नावाच्या मुख्य आरोपीसाठी कमिशन बेसीसवर काम करतात.
मानविंदरसिंह याने कपिल आणि साजीदच्या नावांनी खोटी कागदपत्रे देऊन बनावट बॅंक खाती उघडली होती. व त्या बॅंक खात्यांवर कमिशनचे पैसे जमा होत असत. केजरीवालांच्या मुलीची 34 हजार रूपयांची फसवणूक केल्यानंतर त्यांची ही रक्कम मात्र वारीसच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.
यातील एक आरोपी केजरीवालांच्या मुलीच्या संपर्कात आला. आणि त्यांनी त्यांचा सोफा विकत घेण्याची तयारी दर्शवली. त्याचे पैसे त्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी त्या आरोपीने केजरीवालांच्या मुलीला तिच्या बॅंक खात्याचा तपशील मागवला. ते खाते खरे आहे हे तपासून घेण्यासाठी आरोपीनी त्यांच्या खात्यावर किरकोळ रक्कम जमा करून खातरजमा करून घेत असल्याचे नाटक केले.
त्यानंतर आरोपीने या मुलीला क्युआर कोड पाठवून तो स्कॅन करून घेण्याची सुचना त्यांना केली. त्यानुसार या मुलीने आरोपीने सांगितल्या प्रमाणे कृती केल्यानंतर तिच्याच खात्यातील रक्कम काढून घेण्यात आल्याचे लक्षात आले. या आरोपींनी अन्यही अनेक जणांना याच प्रकारे फसवले असल्याचे पोलिसांनी सांगितले.