10 मुद्द्यांचे गॅरंटी कार्ड आपकडून वितरीत
नवी दिल्ली : मोफत वीज, 24 तास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, प्रत्येक मुलाला जागतिक दर्जाचे शिक्षण ही केजरीवाल यांची गॅरंटी आहे. आपला पक्ष सत्तेत परत आल्यास या 10 मुद्यांच्या गॅरंटी कार्डची पुर्तता करेल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.
आम आदमी पक्ष प्रदुषण 30 टक्क्यांनी कमी करेल. राजधानीत त्यासाठी दोन कोटी वृक्ष लावण्यात येतील. यमुना नदी स्वच्छ करण्यात येईल. तुमच्यापैकी प्रत्येक जण यमुनेत डुबकी मारू शकेल, याची मी खात्री देतो, असेही आपच्या प्रमुखांनी जाहीर केले.
ही केजरीवाल यांची गॅरंटी आहे आपल्याला 24 तास वीज मिळेल. 200 युनिटपर्यंतची वीज मोफत असेल. केवळ 31 मार्चपर्यंत मोफत वीज मिळेल, असा आरोप विरोधक करत आहेत, मात्र ही सुविधा पुढील पाच वर्षे देऊ, असे ते म्हणाले.
विद्यार्थी आणि महिलांसाठी पुढील पाच वर्षे बस प्रवास मोफत असेल. दिल्लीच्या अखेरच्या टोकापर्यंत बस आणि मेट्रोचे नेटवर्क जोडले जाईल. सर्व झोपटपट्टीधारकांना पक्की घरे देण्याची हमीही केजरीवाल यांनी दिली.
येत्या 10 दिवसात पक्षाचा अधिकृत जाहीरनामा प्रकाशित करण्यात येईल. विधानसभेच्या 70 जागांसाठी 8 फेब्रुवारीला मतदान होत आहे. निकाल 11 फेब्रुवारीला लागणार आहे. 2015 च्या निवडणुकीत आपने 67 जागा पटकावल्या होत्या.
आम आदमी पक्षाने आपले 70 उमेदवार जाहीर केले आहेत. तर भाजपाचे 57 तर कॉंग्रेसचे 54 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. केजरीवाल उत्तर दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.