मुंबई : आपने आगामी दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून ठाकरेसेनेकडून इंडिया आघाडीच्या एकोप्याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच, एकोपा टिकवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करत कॉंग्रेसला इशारा अन् सल्लाही देण्यात आला. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल हेही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रमाणे कॉंग्रेसपासून दूर राहण्याचा मार्ग पत्करण्याच्या तयारीत असल्याकडे ठाकरेसेनेने लक्ष वेधले आहे.
देशाची राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणूक अवघ्या २ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या निवडणुकीत आप आणि कॉंग्रेसमध्ये हातमिळवणी होण्याची शक्यता केजरीवाल यांनी नुकतीच फेटाळून लावली. आपची एकला चलो रे अशी भूमिका त्यांनी अधोरेखित केली. त्यावरून ठाकरेसेनेने आपले मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून भाष्य केले. त्यामध्ये आपला राष्ट्रहितासाठी राष्ट्रीय आघाडीतच थांबण्याचे आवाहन करण्यात आले.
त्याशिवाय, आघाडीच्या एकजुटीसाठी केजरीवाल यांचे मन वळवण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. बंगालमध्ये ममता या कॉंग्रेसपासून दोन हात लांब राहून स्वत:चे राजकारण करू पाहत आहेत. केजरीवाल यांनीही तशाच स्वरूपाचा इरादा व्यक्त केला आहे. कॉंग्रेसने चिंतन-मंथन करावे आणि एकोप्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा ठाकरेसेनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
दिल्लीतील सत्ताकाळात शिक्षण, आरोग्य क्षेत्रांत आप सरकारने केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्या जोरावर पंजाबसारखे राज्यही आपने काबीज केले. भाजप आणि कॉंग्रेसला रोखून आपने दिल्ली जिंकली. त्या पक्षाने पंजाबमध्ये कॉंग्रेसचा पराभव केला. जनतेचा पाठिंबा असल्याशिवाय असे यश प्राप्त होत नाही. आपसारखा मित्र असणे ही भाजपविरोधी आघाडीची गरज आहे. आप हा आता प्रादेशिक पक्ष राहिलेला नाही.
अनेक राज्यांत त्या पक्षाचे अस्तित्व निर्माण झाले आहे, याकडे ठाकरेसेनेकडून लक्ष वेधण्यात आले. आपसारख्या पक्षाने दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याची लागण इतर राज्यांत होऊ नये यासाठी कॉंग्रेसला शर्थ करावी लागेल, असेही त्या पक्षाने म्हटले. लोकसभा निवडणुकीआधी अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येत राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीची स्थापना केली. कॉंग्रेस, आप, ठाकरेसेना, ममतांचा तृणमूल कॉंग्रेस हे पक्षही त्या आघाडीचे घटक आहेत.