नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने (आप) तिसऱ्यांदा विजयाची पुनरावृत्ती केली. अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री होतील. केजरीवाल 16 फेब्रुवारीला शपथ घेणार असून शपथविधी सोहळा दिल्लीच्या रामलीला मैदानावर होणार आहे. आपच्या वतीने दिल्लीच्या लोकांना या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. पंतप्रधान केजरीवाल यांच्या शपथविधीस उपस्थित राहतील की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे सर्व नवनिर्वाचित आमदार आणि दिल्लीतील सर्व भाजप खासदारांनाही या सोहोळ्यासाठी निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. आम आदमी पक्षाचे निमंत्रक गोपाल राय म्हणाले की हा केवळ दिल्लीशी संबंधीत कार्यक्रम असल्याने अन्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अथवा बाहेरील राज्यांतील अन्य कोणत्याही नेत्यांना या शपथविधीसाठी निमंत्रणे देण्यात आलेली नाहीत असेही राय यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. रविवारी सकाळी दहा वाजता हा शपथविधी सोहोळा होत असून त्यासाठी केजरीवालांनी वृत्तपत्रांमध्ये जाहीरात देऊन सर्व दिल्लीकरांनाही या शपथविधीसाठी आमंत्रण दिले आहे.