इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी केजरीवाल सरकारचा पुढाकार

नोंदणी शुल्क आणि रस्ते कर माफ : नवी कार घेणाऱ्यांना दीड लाखांचे उत्तेजन

नवी दिल्ली – इलेक्‍ट्रिक वाहन लोकांनी खरेदी करावे व या वाहनाची लोकप्रियता वाढावी याकरिता दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने पुढाकार घेतला आहे.

इलेक्‍ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांना नोंदणी शुल्क आणि रस्ते शुल्क लागणार नाही. केजरीवाल म्हणाले की, त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळून रोजगार निर्मिती होईल. एवढेच नाही तर पर्यावरण संतुलित राहण्यासही यामुळे मदत मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी हे पुरोगामी धोरण जाहीर करताना सांगितले.

केजरीवाल यांच्या या निर्णयानंतर इतर राज्येही या निर्णयाचे अनुकरण करण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. या निर्णयानुसार दुचाकी विकत घेणाऱ्यांना 30 हजार रुपयांचे तर नवीन इलेक्‍ट्रिक कार विकत घेणाऱ्यांना दीड लाख रुपयांची उत्तेजन देण्यात येणार आहे. मात्र हे नेमके कशा पद्धतीने दिले जाणार आहे, याचे स्पष्टीकरण केजरीवाल यांनी केले नाही.

दिल्ली सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पुढील पाच वर्षांत किमान पाच लाख नवीन इलेक्‍ट्रिक वाहने विकली जातील. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी एक वेगळा विभाग स्थापन करण्यात आला आहे. जुनी वाहने मोडीत काढण्यासाठी दिल्ली सरकार मदत करणार आहे. त्याचबरोबर वर्षाला 200 चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.