‘रोड-शो’मुळे केजरीवालांवर ओढवली आव्हाडांसारखी आफत!

नवी दिल्ली – येत्या ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुका पार पडणारा असल्याने विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांची निवडणूक अर्ज भरण्यासाठी लगबग सुरु आहे. अशातच आज आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल करण्यासाठी निघाले होते मात्र निवडणूक कार्यालयात वेळेत पोहचू न शकल्याने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज उद्या दाखल करण्याचा निर्णय घेतला.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, अरविंद केजरीवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज एका ‘रोड-शो’चे आयोजन करण्यात आले होते. वाल्मिकी मंदिरापासून सुरु झालेला हा ‘रोड-शो’ केजरीवाल यांच्या नवी दिल्ली मतदारसंघातून मार्गक्रमण करत पुढे पटेल चौक मेट्रो स्टेशन जवळ थांबणार होता. मात्र केजरीवाल यांची उमेदवारी दाखल करण्यासाठी रस्त्यावर ‘आप’ कार्यकर्त्यांचा जनसागर लोटल्याने ‘रोड-शो’ला नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ लागला.

निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आपण वेळेत पोहचू शकणार नाही असा अंदाज येताच केजरीवाल यांनी देखील आजचा अर्ज भरण्याचा कार्यक्रम रद्द करत कार्यकर्त्यांच्या गर्दीमध्ये सुरु असलेल्या ‘रोड-शो’ला सुरु ठेवणं अधिक पसंत केलं.

दरम्यान, गतवर्षी महाराष्ट्रामध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान जितेंद्र आव्हाड यांची उमेदवारी दाखल करताना देखील ‘रोड-शो’ जास्त वेळ चालल्याने त्यांना निवडणूक आयोगाच्या कार्यालयात वेळेत पोहचता आले नव्हते. परिणामी त्यांना निवडणूक अर्ज ‘रोड-शो’नंतरच्या दिवशी दाखल करावा लागला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.