पंचकुला : अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाच्या मातीचा अपमान केला आहे, जर ते हरियाणाचे झाले नाहीत तर ते दिल्लीचे कसे होऊ शकतात अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे नेते आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी केजरीवालांना लक्ष्य केले. दिल्लीच्या निकालानंतर सैनी यांनी सोशल मीडियावर ही प्रतिक्रिया दिली आहे.
यंदाच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान यमुनेचे दूषित पाणी हा विषय प्रचंड तापला होता. या मुद्द्यावरून हरियाणा आणि दिल्लीमध्ये मोठा राजकीय गोंधळ उडाला. आम आदमी पक्षाचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा सरकारवर आरोप करत म्हटले होते की, हरियाणाच्या भाजप सरकारमुळे यमुनेचे पाणी विषारी होत आहे.
अरविंद केजरीवाल यांच्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनीही हरियाणा सरकारवर यमुना नदीत विष मिसळल्याचा आरोप केला. त्यामुळे हा वाद प्रचंड चिघळला होता. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनीही केजरीवाल आणि आतिशी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले होते. सैनी हे वजिराबादला पोहोचले आणि येथे त्यांनी हरियाणाच्या पाण्याची तुलना दिल्लीच्या यमुना नदीच्या पाण्याशी केली होती.