नवी दिल्ली – दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार सातत्याने शिलकी अंदाजपत्रक सादर करीत असल्याची बाब कॅगच्या नव्या अहवालात नमूद करण्यात आली असून त्याचा दाखला देत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी सांगितले की, हा त्यांच्या प्रामाणिकपणाचा सर्वात मोठा पुरावा आहे. आपच्या प्रामाणिकपणाने विरोधकांची झोप उडवली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
कॅगचा हा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, सन 2015 सालापासून सन 20 सालापर्यंत दिल्ली सरकारने शिलकी अर्थसंकल्प सादर करून खर्चापेक्षा जादाची महसुल शिल्लक राखली आहे. केजरीवाल सरकार दिल्लीतील नागरीकांना वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्य अशा सुविधा मोफत पुरवत आहे.
त्यातून हे सरकार कोणतीही आर्थिक शिस्त न पाळता लोकांना फुकटेगीरीची सवय लावत आहे, असा आरोप त्यांच्यावर केला जात होता. पण लोकांना या मोफत सुविधा दिल्यानंतरही राज्य सरकारच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसुल शिल्लक राहात असल्याचे पुन्हा सिद्ध झाल्याने केजरीवालांना व आम आदमी पक्षाला पुन्हा बळ मिळाले आहे.
“आप सत्तेत आल्यापासून दिल्ली सरकार नफ्यात चालत आहे. हा ‘आप’च्या प्रामाणिकपणाचा सर्वात मोठा पुरावा आहे. या प्रामाणिकपणामुळे विरोधकांची झोप उडाली आहे,” केजरीवाल यांनी हिंदीत ट्विट केले. 2019-20 मध्ये दिल्ली सरकारची महसुली शिल्लक रु. 7,499 कोटी इतकी होती.