कोल्लम – (केरळ)- केरळ उच्च न्यायालयाने अश्लील फोटो ठेवण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पुरुषाने स्वतःजवळ अश्लील फोटो बाळगणे हा स्त्री प्रतिबंधक निषेध कायद्यांतर्गत गुन्हा ठरत नसल्याचा निर्वाळा दिला आहे. एका महिलेने दाखल केलेली याचिका फेटाळत न्यायालयाने हा निर्णय दिला. अश्लील फोटो बाळगणे आणि ते विकणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे महिलेने म्हटले होते.
पोलिसांनी कोल्लम बस स्थानकावर तपास मोहीम राबवली असता, दोन जणांकडे बॅग आढळली, त्यांच्याकडे दोन कॅमेरेसुद्धा होते. त्या व्यक्तींकडे अश्लील फोटो आणि व्हिडीओ असल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली अन् कॅमेरे जप्त केले. या प्रकरणात पोलिसांनी कोल्लम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर अंतिम रिपोर्ट सोपवला.
या संदर्भात न्यायमूर्ती विजय राघवन यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, जर एखाद्या तरुणाकडे अश्लील फोटो असल्यास लागलीच त्याला 1968मधील कलम 60 लागू होत नाही. जर त्याने त्या फोटोंचा इतर कोणत्याही उद्देशासाठी किंवा जाहिरातीसाठी दुरुपयोग केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करता येऊ शकतो. 2008मध्ये या प्रकरणात याचिका दाखल केली होती. त्यानंतर तो निकाल राखून ठेवण्यात आला होता.