कोविड व्यवस्थापन आणि ‘स्मार्टसिटी ऍडव्हायजरी फोरम’बाबत घेतला आढावा
पुणे – पुणे शहरातील करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता प्रयत्नशील असणारे पालकमंत्री आज दिवसभर शहराच्या दौऱ्यावर होते. राजकीय कार्यक्रमांना बगल देत त्यांनी शहरातील करोना व्यवस्थापनाबाबत आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला तसेच पुणे शहराचे राष्ट्रीय स्तरावरील रॅंकिंग घसरल्याच्या मुद्यावरून “स्मार्ट सिटी’च्या कामकाजाबाबत आढावा बैठक घेत त्यांनी अधिकाऱ्यांकडून परिस्थिती जाणून घेत आपल्या स्टाईलमध्ये सूचना केल्या.
करोनाबाधित रुग्णांची संख्या विचारात घेत उपचार सुविधा वाढविण्यात येत आहेत. बाधित रुग्णांना उपचार कमी पडणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. रुग्णालयाची स्वच्छता, रुग्णालयांना ऑक्सिजन, रेमिडिसिव्हीर यासह गोळ्या औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.
कोविड व्यवस्थापनबाबत शुक्रवारी उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी शासन, प्रशासन व जनतेच्या सहकार्यातून करोना संकटावर मात करणे शक्य आहे, असा विश्वास व्यक्त केला.
रुग्णालयांमध्ये स्वच्छता असावी, ऑक्सिजन, रेमडिसिव्हीर इंजेक्शन पुरवठा सुरळीत रहावा, अत्यावश्यक सुविधांची उपलब्धता कायम ठेवावी, गरजू रुग्णाला आरोग्यसुविधा वेळेत मिळाव्यात, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. करोना प्रतिबंध उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करावी.
ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेबाबत प्रशासनाने दक्षता घ्यावी. या बैठकीस लोकप्रतिनिधींसह विभागीय आयुक्त सौरभ राव, ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगम, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा
‘स्मार्ट सिटी’तील कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा, जेणेकरून शहराचे घसरलेले राष्ट्रीय स्तरावरील रॅंकिंग सुधारेल. यासंदर्भातील कामे करून घेताना विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकमेकांत समन्वय ठेवावा, अशा सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केल्या.
‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या “स्मार्टसिटी ऍडव्हायजरी फोरम’ची पाचवी बैठक पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन सभागृहात झाली. विभागीय आयुक्त सौरभ राव, पालिका आयुक्त विक्रमकुमार, “पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, ऍडव्हायजरी फोरमचे सदस्य सतीश मगर, अनिरुद्ध देशपांडे आदी उपस्थित होते.
कामे वेळेत पूर्ण करताना लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेतले पाहिजेत, याशिवाय ती वेगाने पूर्ण करताना त्याचा दर्जा राखला जावा तसेच या कामात पारदर्शकता असली पाहिजे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच या कामाच्या निधीचा योग्य उपयोग झाला पाहिजे. शहराचे सौंदर्य, वैभव वाढवण्याबरोबरच उत्तमप्रकारच्या सुविधाही नागरिकांना मिळाल्या पाहिजेत, असे पवार यांनी नमूद केले. “स्मार्ट सिटी’ अंतर्गत हाती घेतलेले प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्यासाठी नियोजन करा. या प्रकल्पासाठी निधीचे योग्य नियोजन करून कामे वेळेत व्हायला हवी आहेत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
उपस्थित लोकप्रतिनिधी….
राज्य उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे (ऑनलाइन), पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार गिरीष बापट, डॉ.अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील कांबळे, आमदार सुनील टिंगरे आमदार अतुल बेनके, आमदार सिद्धार्थ शिराळे यांनी या बैठकींना उपस्थिती होती.