‘कीप द चेंज’ सव्वा कोटी रूपयांवर; डिलिव्हरी बॉयकडून ग्राहकांची लूट

घरपोच सिलिंडरसाठी मूळ किंमतीपेक्षा जास्त रुपये


दररोज सुमारे 5 ते 7 लाख रुपये अतिरिक्‍त “कलेक्‍शन’

– गणेश आंग्रे

पुणे – गॅस सिलिंडरच्या मूळ किंमतीपेक्षा जास्त रुपये घरपोच सिलिंडर देणाऱ्या व्यक्तींकडून (डिलिव्हरी बॉय) आकारले जात असल्याचे प्रकार उघड आहेत. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड पडत असून, ती एकप्रकारे लूटच ठरत आहे. ही रक्‍कम हजारांत नाही, तर ती दररोज लाखांमध्ये असल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे.

जिल्ह्यात दररोज सुमारे 60 ते 70 हजार गॅस सिलिंडरचे वितरण केले जाते. एका सिलिंडरमागे डिलिव्हरी बॉय पावतीवरील किंमतीच्या 10 ते 20 रुपये जादा घेतात. या आकडेवारीनुसार शहर आणि ग्रामीण भागातील गॅस एजन्सीकडील डिलिव्हरी बॉय दररोज सुमारे पाच ते सात लाख रुपये अतिरिक्त गोळा करत आहेत. यात 10 ते 20 रुपये प्रत्यक्षात जरी लहान रक्कम दिसत असली, तरी महिन्याची ही एकूण रक्कम सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या घरात जाते. हीदेखील धक्‍कादायक बाब आहे.

घरपोच गॅस सिलिंडर उपलब्ध करून देणे एजन्सीची जबाबदारी आहे, त्यामध्ये एकूण किंमतीचाही समावेश केलेला असतो. सिलिंडर बुक केल्यानंतर एजन्सीकडील डिलिव्हरी बॉय घरपोच सिलिंडर आणून देतात. त्याचेच त्यांना वेतनही मिळते. असे असताना डिलिव्हरी बॉय ग्राहकांकडून जादा पैसे घेत असल्याच्या अनेक तक्रारी येतात.

“लिफ्ट नसलेल्या इमारतींमध्ये तीन मजले चढून सिलिंडर आणले’ वगैरे कारणे दिली जातात. काही ग्राहक याविरुद्ध आवाज उठवून गॅस एजन्सीची तक्रार थेट संबंधित तेल कंपन्यांकडे करतात. याची दखलही घेतली जाते. मात्र अनेक ग्राहक तक्रार करत नाही. उलट काय फरक पडतो, या भावनेतून डिलिव्हरी बॉयला 10-20 रुपये देऊन टाकतात, त्यामुळेच त्यांचे फावते.

लोकांना नियमच माहिती नाहीत. ऑइल कंपन्या जाणूनबुजून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवत नाहीत. हे नियम सांगण्याची जबाबदारी या ऑइल कंपन्यांची आहे. घरी गॅस पाइपलाइन देताना मात्र जाहिरात केली जाते, तर मग नियमांची जाहिरात का केली जात नाही? एवढेच नव्हे, तर तुम्ही घरपोच सेवा न मागता एजन्सीच्या गोडाऊनमधून सिलिडर स्वत: ग्राहकाने नेले तर त्याला किंमतीवर 15 रुपये परतावा मिळतो. ही गोष्टही ग्राहकांना माहित नसते आणि एजन्सीकडूनही ती सांगितली जात नाही. अशाप्रकारे “हपापाचा माल गपापा’ केला जातो.
– विवेक वेलणकर, अध्यक्ष, “सजग नागरिक मंच’.

चहा-पाण्याला पैसे
“आम्ही सिलिंडर वरच्या मजल्यापर्यंत आणून देतो. तुम्हाला घरपोच सिलिंडर देतो. त्यामुळे चहा पाण्याला तरी पैसे द्या,’ अशी मागणी डिलिव्हरी बॉय करतात. त्यामुळे काही ग्राहक या भावनेतेतून 10-20 रुपये देतात.

वाद घालण्याची भीती
ग्राहकांनी जादा पैसे देण्यास नकार दिल्यास डिलिव्हरी बॉय त्यांच्याशी वाद घालतात. पुढच्या वेळी हा माणूस सिलिंडर आणून देणार नाही. त्यावेळी स्वयंपाक कसा करणार, या भीतीपोटी काही ग्राहक नाईलाजाने वरचे पैसे देतात.

…म्हणून येते अडचण
गॅस सिलिंडरचे बुकिंग ऑनलाइन अथवा मोबाइलद्वारे होते. घरातील एकाच व्यक्तीचा मोबाइल क्रमांक संबंधित गॅस कंपनीकडे रजिस्टर असल्याने गॅस बुकिंगचा एसएमएस तसेच गॅस सिलिंडर किंमतीचा एसएमएस एकाच व्यक्‍तीला येतो. ही व्यक्ती कामानिमित्त घराबाहेर असेल, त्यावेळी सिलिंडर आल्यास घरातील व्यक्‍ती डिलिव्हरी बॉय जी सांगेल ती किंमत देऊन मोकळे होतात. घरातील व्यक्‍तीला (ग्राहकाला) गॅस सिलिंडरची किंमत किती आहे, याची माहिती नसल्याने ज्यादा किंमत सांगून डिलिव्हरी बॉय ती रक्‍कम उकळतात.

पावती देण्यास नकार
गॅस सिलेंडर देतेवेळी ग्राहकांना सिलिंडरच्या किंमतीची पावती मिळणे आवश्‍यक आहे. मात्र डिलिव्हरी बॉय ग्राहकांना पावती देत नाही. पावती हवी असेल तर दुकानात या, असे उत्तर देतात. तसेच गॅस सिलिंडरच्या पुस्तकावर फक्‍त सिलेंडर दिल्याची तारीख याची नोंद करतात. पावती मिळत नसल्याने गॅस सिलेंडरची खरी किंमत ग्राहकांना कळत नाही.

एजन्सी पगार देते, तरीही…
गॅस एजन्सीचालक डिलीव्हरी बॉयला 6 ते 10 हजार रुपयांपर्यंत पगार देतात. तो ठरवताना या “टीप’चा विचार गॅस एजन्सी चालक करत असतात. त्यामुळेच हे ग्राह्य धरून या पगारात परवडत नसल्याने आम्ही ग्राहकांकडे 10-20 रुपये घेतो, अशी प्रतिक्रिया एका डिलीव्हरी बॉयने दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)