जिल्ह्यात यंत्रणा अलर्ट ठेवा : ना. पाटील 

कराड – जिह्यात करोना विषाणू संसर्गाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सोमवारी येथे बैठकीत घेतला. त्याचबरोबर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चक्री वादळाची शक्‍यता वर्तवली जात असल्याने जिल्ह्यात वादळी पावसासह वादळाची शक्‍यता आहे. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापनाच्या जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सज्ज ठेवा, अशा सूचना पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, डॉ. संगीता देशमुख, डॉ. प्रकाश शिंदे, मुख्याधिकारी यशवंत डांगे, मुख्याधिकारी संजिवनी दळवी, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार उपस्थित होते. परराज्य व जिह्यातून येणाऱ्या व्यक्तींमुळे जिल्ह्यात करोना विषाणू संसर्गात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीत बाहेरून आलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यासंबंधी ग्रामसमित्या सक्रिय आहेत का, तसेच करोना फैलाव रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा व सद्य परिस्थितीतील बाधित रुग्णांचा आढावा ना. पाटील यांनी घेतला.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरावर प्रयत्न चालू आहेत. प्रत्येकाने टीमवर्क म्हणून काम करावे. करोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हॅंडवॉशच्या वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. विलगीकरण कक्षात असलेल्या रुग्णांची दररोज नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी. करोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

अरबी समुद्रात चक्री वादळाच्या शक्‍यतेने वादळी पावसाची तसेच वादळाची शक्‍यता आहे. रविवारी वादळी पावसाने सातारा जिल्ह्यात अनेक ठिकणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी. तसेच करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विशेष काळजी घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.