पुणे विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालयांना सूचना; समुपदेशन सत्र आयोजित
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्च-एप्रिल महिन्यात परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षा कालवधीत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परीक्षार्थींना हात धुण्यासाठी साबण अथवा सॅनिटायजर तसेच पुरेशा पाण्याची व्यवस्था ठेवावी, अशा सूचना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने सर्व महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रांना दिल्या आहेत.
करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी पुणे विद्यापीठाकडूनही आवश्यक ते सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. त्यातच आता विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षा सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्याची सूचना विद्यापीठाने केली आहे.
महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांमध्ये वातावरण हवेशीर असावे. दरवाजे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात. तसेच संपूर्ण परिसरात स्वच्छता राखावी. शक्य झाल्यास परीक्षार्थींची बैठक व्यवस्था एकाआड एक बाकावर करावी. अथवा दोन बाकांमध्ये पुरेसे अंतर ठेवावे. परीक्षा नियंत्रण कक्षामध्ये त्यादृष्टीने तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.
दरम्यान, विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागातर्फे स. प. महाविद्यालय, फर्गसन महाविद्यालय आणि चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात समुपदेशन सत्र आयोजित केले होते. करोनामुळे हे सत्र पुढे ढकलण्यात आले आहे, असे प्रशासनाने सांगितले.